अंदाजे ७० लाखांचे नुकसान
दोन दुचाकीही आगीच्या भक्ष्यस्थानी
चंदगड (प्रतिनिधी): चंदगड तालुक्यातील कुदनुर येथे लागलेल्या भीषण आगीत साॅमील, ऑईल मिल व फॅब्रिकेटर्स कारखाना खाक झाला. या दुर्घटनेत अंदाजे ७० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
कुदनूर येथील शशिकांत शिवराम सुतार, गजानन सुतार, तुकाराम सुतार, दिलीप सुतार व जानबा सुतार यांच्या मालकीच्या सिद्धेश्वर सॉमिल, सिद्धेश्वर ऑईल मिल व शिवराम फॅब्रिकेटर्स या नावाने व्यवसाय आहे. हे तीनही उद्योग एकमेकाला लागून असल्याने आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. यामध्ये कारखान्याच्या आतमध्ये ठेवलेल्या दोन दुचाकीही आगीत खाक झाल्या असून या ठिकाणी बांधलेल्या दोन बकरीही होरपळल्या आहेत. दरम्यान, गडहिंग्लज नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला कळवल्यानंतर यंत्रणा तातडीने दाखल झाली मात्र हा बंब येईपर्यंत हे तीनही कारखाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.
दरम्यान, घटनास्थळी माजी रोहयो मंत्री भरमूअण्णा पाटील यांच्यासह अनेकांनी धाव घेत पाहणी केली.


