Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली


नागपूर :
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जडणघडणीत अमूल्य वाटा असणाऱ्या त्यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांचे निधन अत्यंत दुःखद असल्याची शोकभावना व्यक्त करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमती हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“श्रीमती हिराबेन यांच्यासारख्या धर्मानुरागी, सात्विक व्यक्तिमत्त्वाचे निधन ही समाजाची हानी आहे. नियतीचक्रामुळे आज श्रीमती मोदी यांची इहलोकीची यात्रा संपली. ही बाब पुत्र म्हणून प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्यासाठी एक आघात आहे. आईचा वियोग ही दुःखाची परिसीमा असते. प्रधानमंत्री श्री. मोदी यांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. मातृतुल्य श्रीमती हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!” अशी शोकभावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सदैव प्रेरणास्रोत असलेल्या मातोश्री हिराबेनजी मोदी यांच्या निधनाने मोदीजींच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांचे जाणे सर्वांसाठी दुःखद आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिराबांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या शोक संदेशात म्हणतात, “हिराबा १०० वर्षे सेवाव्रती आणि संघर्षमय जीवन जगल्या. त्यातूनही त्यांनी मोदीजींवर जे संस्कार केले त्यातून देशाला कणखर, प्रभावी आणि निर्णयक्षम नेतृत्व मिळाले”.

“वयाच्या १०० व्या वर्षीही कुठलेही काम बुद्धीने आणि मनाच्या शुद्धीने करण्याची शिकवण त्या देतात यावरून त्यांचा कणखरपणा दिसून येतो. श्री. मोदीजी आणि हिराबा यांचे आत्मीय नाते होते. जेव्हा जेव्हा मोदीजी त्यांना भेटायला जायचे तेव्हा तेव्हा दृढ आणि तेवढ्याच प्रेमळ हिराबा आपणा सर्वांना पाहायला मिळायच्या. अशा मातांमुळे आपला देश महान आहे. आई सोबत नसणे हे जगातील सर्वात मोठे दुःख असते, श्री. मोदीजी, त्यांचे कुटुंब व स्नेही यांना या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.