Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दक्षिण कमांडच्या सैनिकांकडून व्यापक रक्तदान मोहीम


मुंबई
: देशाच्या दक्षिण भागात लष्कर दिनाच्या अगोदर आयोजित करण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांचा भाग म्हणून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तेलंगण, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान,मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांच्या विविध भागांमध्ये तैनात सैन्याच्या  कार्यालये आणि युनिट्सकडून आज व्यापक रक्तदान मोहीम हाती घेण्यात आली. भारतीय लष्कराने ही मानवतावादी मोहीम प्रमुख सरकारी रूग्णालये आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हाती घेतली असून गरजू रूग्णांना योग्य वेळेवर दान केलेले रक्त पोहचावे, याची सुनिश्चिती करण्यासाठी ही मोहीम होती.

'रक्तदान करा-जीव वाचवा' या संकल्पनेंतर्गत ही रक्तदान मोहीम आयोजित करण्यात आली  होती. दक्षिण कमांडने येत्या 15 जानेवारी 2023 रोजी होत असलेल्या भारतीय लष्कराच्या 75 व्या स्थापना दिनानिमित्त ही रक्तदान  शिबिरे आयोजित केली. स्वयंस्फूर्तीने केलेल्या रक्तदानातून 7,500 बाटल्या रक्त जमा करण्यात आले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत वापरता येण्यासाठी 75,000 स्वयंसेवकांनी केलेल्या रक्तदानाद्वारे रक्तसाठा संकलित करण्यात आला.  लष्करी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांकडून तसेच मुलकी संरक्षण कर्मचारी, राष्ट्रीय  छात्र सेनेचे कॅडेट्स, महाविद्यालयीन विद्यार्थी, सैनिकी शाळांचे शिक्षक आणि जीवनाच्या सर्व स्तरांतील स्वयंसेवकांचा अभूतपूर्व प्रतिसाद या मोहीमेस मिळाला. दक्षिण कमांडवर ज्या क्षेत्राची जबाबदारी आहे त्या दहा राज्यांतील सर्व प्रमुख शहरांमध्ये तसेच दुर्गम  भागातील प्रदेशांमध्येही ही शिबिरे आयोजित केली होती.

पुणे येथे कमांड रूग्णालय, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस(एआयसीटीएस-सैनिक हृदय वक्ष विज्ञान संस्थान), खडकी आणि खडकवासला येथील लष्करी रूग्णालय या चार ठिकाणी रक्तदान मोहीम हाती घेण्यात आली. येथे जवळपास 700 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. पुण्यातील रक्तदान मोहीमेचे उद्घाटन दक्षिण कमांड मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल मंजीत  कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.