Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सीमाबांधवांचा आधारवड हरपला!

 बेळगाव येथील ॲड. राम आपटे यांचे वृद्धापकाळाने निधन 


बेळगाव (प्रतिनिधी): 
बेळगाव येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे लढवय्ये नेते, नामवंत वकील व समाजवादी कार्यकर्ते ॲड. राम आपटे (दादा) यांचे आज पहाटे वयाच्या ९७ वर्षी राणी चन्नम्मा नगर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी मरणोत्तर देहदान केल्यामुळे सकाळी ११ वा.पर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

 ॲड.आपटे यांचा जन्म १९२६ साली झाला. भारतीय स्वतंत्र लढ्यात गांधीजींचे अनुयायी म्हणून 'छोडो भारत' चळवळीचे ते कार्यकर्ते बनले. पुढे सीमाप्रश्नाच्या कायदेशीर लढ्यात सक्रिय झाले. त्यांनी कामगारांच्या पाठीशी कायद्याची ताकद उभी केली होती.  वयाच्या ९० नंतरही त्याच तळमळीने काम करत राहणारे बेळगावचे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या या निधनाने सीमा भागातील जनतेचा आधारवड हरपला आहे.

बेळगाव सीमाप्रश्नाच्या वकिलांच्या तज्ञ समितीत ते होते. मागील वर्षी त्यांनी मुंबईत झालेल्या बेळगाव सीमाप्रश्न तज्ञ समितीच्या बैठकीला या वयात देखील हजेरी लावली होती. त्यामुळे सीमा प्रश्नाप्रती असलेली त्यांची तळमळ दिसून आली होती. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी खर्ची घातली. सीमा प्रश्नाचा संपूर्ण इतिहास मांडणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक त्यांनी लिहिले होते. सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी या पुस्तकाची मोलाची मदत होणार आहे. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून व्यापक कार्य केले होते. कामगारांचे प्रश्न सोडवणुकीसाठी त्यांनी अखंड लढा दिला होता. त्यामुळे ते कामगार नेते म्हणूनही परिचित होते. त्यांच्या निधनामुळे बेळगावातील सीमा बांधवांचा सच्चा कैवारी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.