गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात गणित विभागाच्यावतीने 'राष्ट्रीय गणित दिन' साजरा करण्यात आला.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा.सचिन कांबळे यांनी केले. यावेळी गणित विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे अनावरण शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड.दिग्विजय कुराडे व प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये प्राचीन कलाकृतीमध्ये गणिताचा वापर कशाप्रकारे केला आहे व गणितात शून्याचा शोध कसा, कोठे लागला याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. गणित हा विषय आज फार अवघड आहे असे न मानता त्यातून करिअर करण्याचा प्रयत्न होणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले.
प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी भारतातील थोर गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचे गणितातील कार्य व त्यांनी दिलेले योगदान तसेच त्यांच्या कार्याचा आढावा आपल्या मार्गदर्शनातून सांगितले. या कार्यक्रमास प्रा.कृष्णा कदम, प्रा. दिपिका खांडेकर-पंडित यांच्यासह अन्य प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार प्रा.कृष्णा कदम यांनी मानले.


