Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींसाठी ७७ टक्के मतदान

महागाव केंद्रावर दोन गटात वाद, पोलिसांचा सौम्य लाठीमार 

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची तालुक्यातील संवेदनशील केंद्राना भेट

महागाव, हरळी खुर्द येथे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांना करावी लागली प्रतीक्षा 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
गडहिंग्लज तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींसाठी रविवारी मोठ्या चुरशीने एकूण ७७ टक्के मतदान झाले. दरम्यान, महागाव येथील मतदान केंद्रावर दोन गटात वाद झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. तर हरळी खुर्द व महागाव येथील केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांना काहीकाळ प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी संवेदनशील महागाव येथील मतदान केंद्राला भेट देत सुरक्षा व्यवस्थेबाबत आढावा घेतला. बंदोबस्ताबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गडहिंग्लजचे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके उपस्थित होते. तहसीलदार दिनेश पारगे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.

गडहिंग्लज तालुक्यात एकूण ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. पैकी कडलगे, बटकणंगले, कडाल, कौलगे या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत. पैकी हसुरसासगिरी व वैरागवाडी येथे सदस्य पदासाठी निवडणूक बिनविरोध झाली असली तरी सरपंच पदासाठी या दोन्हीही गावात निवडणूक प्रक्रिया पार पडली.

महागाव येथील शिवाजी विद्यालयातील मतदान केंद्रावर दुपारी दोनच्या दरम्यान दोन गटात काही कारणावरून वादावादी झाली. दोन्हीही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी दोन्हीही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. यामुळे या मतदान केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला होता.

तसेच महागाव येथील शिवाजी विद्यालयातील या मतदान केंद्रावर  मतदान सुरू असताना ईव्हीएम मशीनमध्ये देखील बिघाड निर्माण झाल्याने काही काळ मतदारांना प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर दुसरे ईव्हीएम मशीन बसविल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली.

हरळी खुर्द येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनही बंद पडल्याने येथेही काही काळ मतदारांना ताटकळत बसावे लागले. अधिकाऱ्यांनी तातडीने ही समस्या दूर करत मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू केली.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.