अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 साठी अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा म्हणून ओळखला जाणारा हलवा सेवन उत्सव आज दुपारी केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि डॉ. भागवत किसनराव कराड यांच्या उपस्थितीत नॉर्थ ब्लॉकमध्ये साजरा झाला.
अर्थसंकल्प तयार करून तो "लॉक-इन" करण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी दरवर्षी परंपरेप्रमाणे हलवा सेवन समारंभ आयोजित केला जातो. मागील दोन केंद्रीय अर्थसंकल्पांप्रमाणे, केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 देखील कागदविरहीत (पेपरलेस) स्वरूपात असेल. केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 हा 1 फेब्रुवारी 2023 रोजी सादर होणार आहे. सर्व 14 केंद्रीय अर्थसंकल्पीय दस्तावेज, ज्यात घटनात्मक तरतुदींनुसार वार्षिक आर्थिक विवरण (सामान्यत: जो अर्थसंकल्प म्हणून ओळखला जातो), अनुदानाची अपेक्षा (DG), वित्त पत्रिका (फायनान्स बिल) "केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल ॲप" वर संसद सदस्यांना (खासदार) आणि सामान्य जनतेला डिजिटल रुपात सहजपणे उपलब्ध होईल.हा अर्थसंकल्प दोन भाषेत (इंग्रजी आणि हिंदी) आणि Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. हे ॲप केंद्रीय बजेट वेब पोर्टल (www.indiabudget.gov.in) या संकेतस्थळावरून देखील डाउनलोड केले जाऊ शकते.
1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण झाल्यानंतर अर्थसंकल्पाची कागदपत्रे मोबाईल ॲपवर उपलब्ध होतील.
या समारंभाचाच एक भाग म्हणून, अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मुद्रणालयाचा दौरा देखील केला आणि तेथील तयारीचा आढावा घेऊन या कामात सहभागी अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

