Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तब्बल ३६ वर्षानंतर वर्ग मित्रांनी मारली एकमेकांना टोपण नावांनी हाक

नरेवाडीतील महात्मा गांधी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा 

३६ वर्षानंतर १९८५-८६  बॅचचे   वर्गमित्र भेटले खोपोली येथे एकत्र   


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
कोण कसा दिसत असेल, तो मला ओळखेल का? असे अनेक प्रश्न मनात धरत सर्वांनी बऱ्यापैकी पन्नाशी ओलांडलेले वर्गमित्र तब्बल ३६ वर्षानंतर एकमेकांना भेटत टोपण नावाने हाक मारत एकमेकांची गळाभेट घेतली. हा प्रसंग आहे नरेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील महात्मा गांधी हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या १९८५- ८६ बॅचच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत खोपोली येथे आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याचा.

नरेवाडीतील महात्मा गांधी हायस्कूलच्या १९८५- ८६  या इयत्ता दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी खोपोली येथे स्नेहमेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. दिनांक २१ व २२ जानेवारी असे दोन दिवस मुक्काम करण्याचेही ठरविण्यात आले. या माजी विद्यार्थ्यांमध्ये एकूण २२ जणांचा ग्रुप होता. यामध्ये सर्वजण बऱ्यापैकी पन्नाशी ओलांडलेले वर्गमित्र होते. तब्बल ३६ वर्षानंतर  हे पुन्हा एकमेकांना भेटणार होते त्यामुळे सर्वांच्या मनामध्ये उत्सुकता होती. तारीख निश्चित झाल्यानंतर हे सर्व मित्र आपापल्या पद्धतीने कार, रेल्वे, बसने प्रवास करत खोपोली येथे पोहोचले. या प्रवासादरम्यान कोणालाही कोणतीही अडचण येऊ नये यासाठी एकमेकांनी  प्रवासातील आपले लोकेशन टाकून काळजी घेतली.

खोपोली येथील मॉनटेरिया रिसॉर्ट येथे सर्वजण पोहोचले. पोचता क्षणीच एकमेकांनी शाळेतील टोपण नावाने हाक मारत गळाभेट घेतली. केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर वर्ग मित्रांनी एकमेकांची ओळख आपल्या मनोगतातून थोडक्यात करून दिली.

तब्बल ३६ वर्षानंतर हे वर्गमित्र भेटल्याने आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकांना सांगत सर्वजण पहाटे तीन वाजेपर्यंत गप्पा गोष्टींमध्ये रमले होते. जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने हे वर्गमित्र रात्रीची झोपही विसरून गेले होते. पुन्हा पहाटे उठून वॉटर पार्क येथे लहान मुलांसारखे सर्व वर्ग मित्रांनी मौजमजा केली. त्यानंतर एकत्रित भोजन केले. परतताना एकमेकांनी जड अंतकरणाने गळाभेट घेत आभार मानत सर्वांनी आपला परतीचा प्रवास केला. ३६ वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ग मित्रांची ही भेट स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून झाल्याने सर्व मित्रांना मनोमनी आनंद झाला. वयाने या मित्रांनी पन्नाशी ओलांडली असली तरी जुन्या आठवणींमुळे त्यांची मने मात्र पुन्हा तरुण झाली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.