Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महामार्ग वहिवाटीची खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा रस्त्याची रुंदी मोजणार

संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी, पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय

मोजणीसाठी लवकरच तारखा निश्चित करणार 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
संकेश्वर- बांदा महामार्ग रुंदीकरणाची मोजणी गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील काही ठिकाणी पुन्हा एकदा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आमच्या वहिवाटीच्या हद्दीतच रस्त्याचे काम सुरू असल्याचा दावा महामार्ग प्राधिकरणकडून केला जात असल्याने याबाबत खात्री करून वहिवाट सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा एकदा ही मोजणी करण्यात येणार आहे. या मोजणीसाठी  लवकरच तारखा निश्चित करण्यात येणार आहेत.

महामार्ग बाधित शेतकरी, पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नगरपालिकेच्या शाहू सभागृहात संयुक्त बैठक पार पडली. यावेळी माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक, महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांच्यासह उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी टी.एस. शिरगुप्पे उपस्थित होते.

संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा देत दोन दिवसापूर्वी उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी संयुक्त बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आज ही बैठक पार पडली. या बैठकीत माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे यांनी महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या समस्या याबाबत अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. काही सूचनाही मांडल्या. सध्या महामार्गाच्या कामासाठी रुंदीकरण करण्यात येत आहे. यासाठी रस्त्याकडेला असणारी  झाडे तोडण्यात येत आहेत. हे रुंदीकरण करत असताना शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनी, झाडेही ताब्यात घेतल्या जात आहेत. मात्र विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना महामार्गाचे काम हे आमच्या वहिवाटीप्रमाणे होत असल्याचे प्राधिकरणकडून सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यानी याला कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे शासनाने महामार्गाचे काम करत असताना पहिल्यांदा आपली वहिवाट सिद्ध करून दाखवावी मगच काम सुरू करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या महामार्गात येणाऱ्या गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील काही गावांमध्ये पुन्हा एकदा या रस्ता रुंदीकरणाचे मोजमाप करून खात्री करण्याचे ठरविण्यात आले. तसेच जिल्हास्तरावर एक व्यापक बैठक घेण्याचेही ठरविण्यात आले. या बैठकीस संजय तर्डेकर, शिवाजी इंगळे, जयवंत थोरवतकर, विशाल गुरव यांच्यासह  शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व महामार्ग बाधित शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.