गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील सुभाष चित्र मंदिरात पठाण चित्रपटाचा सुरू झालेला खेळ शिवसेनेसह इतर हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रित येत बंद पाडला.
पठाण चित्रपट हा गेल्या काही महिन्यापासून वादग्रस्त दृश्यांमुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याने हिंदू संघटनांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध केला होता. हा चित्रपट गडहिंग्लज येथील चित्रपटगृहांमध्ये देखील प्रदर्शित करू नये अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेनेही काही दिवसापूर्वी दिला होता. दरम्यान, गडहिंग्लज मधील सुभाष चित्र मंदिरात हा चित्रपट प्रदर्शित झाल्याची माहिती शिवसेनेसह इतर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळताच चित्रपटगृहात येऊन खेळ बंद पाडून चित्रपटाला कडाडून विरोध केला.
यावेळी काशिनाथ गडकरी, प्रतीक क्षीरसागर, अवधूत पाटील, दिगंबर पाटील, संभाजी येऊडकर, तेजस घेवडे, गिरीष मडलगी, मनोज पोवार, सागर कुराडे, संदीप नाथबुवा, रमेश कोरवी आदींसह हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



