कचेरीच्या मागील रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारा "तो कठडा" मनसेने हटविला
वाहनधारक व नागरिकातून समाधान व्यक्त
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथील कचेरीच्या पाठीमागील बाजूस रस्त्याच्या मधोमध असणारे व वाहतुकीस अडथळा ठरणारे 'ते दगड' व भिंतीचा अर्धवट कठडा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या पुढाकाराने हटविण्यात आले. प्रत्यक्ष जिल्हाध्यक्ष चौगुले यांच्यासह कार्यकर्त्यांनी तो दगड व कठडा उखडून टाकल्याने मनसेच्या ह्या श्रमदानाचे मात्र शहरासह तालुक्यातील नागरिकांनी कौतुक केले आहे.
शहरातील विविध शासकीय कार्यालये या ठिकाणी आहेत. या कार्यालयांपाठीमागेच हा रस्ता असून या रस्त्यावर सतत रहदारी असते. हा रस्ता जवळचा व विविध कार्यालयांकडे जाणारा असल्याने नागरिक सतत याच रस्त्याचा वापर करताना दिसतात. मात्र या रस्त्यावर मधोमध एक दगड व बाजूला भिंतीचा कठडा अर्धवट स्थितीत अडथळा ठरत असल्याने दुचाकी वगळता इतर वाहने जाण्यास मोठा अडथळा निर्माण होत होता.
परिणामी एकाच वेळी एकच वाहन येथून निघेल अशी अवस्था होती. याबाबत मनसेने प्रशासनाचे लक्ष वेधून हे दगड व कठडा हटविण्याची मागणी केली होती. मात्र कार्यवाही झाली नसल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी कार्यकर्त्यांसह 'तो दगड' व कठडा हटवून रस्ता रहदारीस खुला केला. मनसेच्या या 'ॲक्शन मोडचे' नागरिकांतून कौतुक होताना दिसत आहे.
यावेळी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले म्हणाले, कचेरीच्या पाठीमागे हा दगड व अर्धवट असलेली भिंत पाडून रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी आम्ही अर्धवट भिंत काढून डांबरी रस्ता करणार आहोत असे आश्वासन दिले होते. रस्ता नंतर करा प्रथम अर्धवट भिंत काढून घ्या, त्या भिंतीमुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितले होते. या ठिकाणी पोलीस ठाणे, बांधकाम विभाग, दुय्यम निबंधक, पंचायत समिती व अलीकडे बाजूस एम.आर. कॉलेज, शिवराज कॉलेज व जिल्हा न्यायालय असल्यामुळे नागरिकांना हा रस्ता सोयीस्कर आहे. त्या ठिकाणी आजूबाजूला पडके स्वच्छतागृह असल्याने दुर्गंधीही खूप येत आहे. त्या ठिकाणी झुडपे व कचरा पडलेला असून तो सुद्धा स्वच्छ करून घ्यावा अशी मागणी मनसेने करून देखील प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रस्ता खुला करून देण्यात आल्याचे श्री.चौगुले यांनी सांगितले.
यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे, शहर अध्यक्ष केंप्पाना कोरी, शहर उपाध्यक्ष अभिजित देसाई, फुले-आंबेडकर विद्वत्त सभा जिल्हा समन्वयक एस. आर. कांबळे, दादा कडूकर, सुनिल कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.





