स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रांताधिकारी यांच्याकडे मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): नियोजित संकेश्वर- बांदा महामार्गाच्या कामासाठी वृक्षतोड करत असताना मोटरसायकल स्वारावर झाडाची फांदी पडून घडलेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य सचिव राजेंद्र गड्यानावर यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, संकेश्वर- बांदा महामार्गाचे काम गडहिंग्लज तालुक्यात वेगाने सुरू आहे. त्याकरिता रस्त्याच्या दुतर्फा असलेले वृक्ष तोडण्याचे काम सुरू आहे. सदर वृक्षतोडीबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, ठेकेदार त्यांच्याकडे परवाना आहे काय? असल्यास किती झाडांचा परवाना व प्रत्यक्ष किती झाडांची तोड झाली याची सखोल चौकशी उपवनसंरक्षक यांच्याकडून होणे जरुरीचे आहे. १९ डिसेंबर रोजी महामार्गासाठी वृक्ष तोडत असताना या मार्गावरून जाणाऱ्या हसुरचंपू येथील रामा फुटाणे यांच्या मोटरसायकलवर फांदी पडल्याने त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी जखमी झाल्या होत्या. त्याचबरोबर झाड तोडणारा कामगार देखील झाडावरून खाली पडल्याने तो देखील गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना घडली होती.
महामार्गाचे काम करत असताना कोणतेही संरक्षित उपायोजना न करता बेफिकिरीने व हलगर्जीपणाने वृक्षतोडीचे काम सुरू असल्याने सदर दुर्घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्गच्या संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी कर्तव्यपालनात कसूर केले आहे. असेच निष्काळजीपणे काम सुरू राहिल्यास आणखी दुर्घटना घडू शकतात. या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
याबाबत आठ दिवसात तातडीने बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर राजेंद्र गड्यानावर, ॲड. दशरथ दळवी, ॲड.आप्पासो जाधव, तम्मांना पाटील, आण्णासो पाटील, फुलाजी खैरे, रामचंद्र गवळी, विरूपाक्ष कुंभार यांच्यासह इतरांच्या सह्या आहेत.

