प्रभाग ६ मधील अळीमिश्रित पाणीपुरवठा प्रश्नी उपाययोजना
नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा सुरु
नागरिकांतून समाधान व्यक्त
![]() |
| गडहिंग्लज : प्रभाग सहा मधील आळीमिश्रित पाणी प्रश्नी पालिकेने काही ठिकाणी असणारी गळती काढत उपाययोजना केल्या. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये नागरिकांना अळीमिश्रित पाण्याचा पुरवठा होत होता. या पार्श्वभूमीवर मनसेने या समस्येकडे लक्ष घालत पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले होते. तातडीने उपाययोजना न केल्यास पालिकेत जाऊन मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर पालिका प्रशासनाने तातडीने या भागात पाईपलाईनमध्ये असणारी गळती शोधून काढत दुरुस्तीचे काम केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
गडहिंग्लज शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधील काजू बाग परिसरात अळीमिश्रित पाण्याचा पुरवठा होत होता. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. पाण्यात स्पष्टपणे अळ्या दिसून येत होत्या. या संदर्भात येथील नागरिकांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांना याबाबतची कल्पना देत या समस्येकडे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर श्री.चौगुले यांनी या परिसराला भेट देत पाण्याची पाहणी केली होती. यामध्ये पाण्यात अळ्या आढळून आल्या होत्या. संबंधित पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांना तातडीने पाण्याच्या टाकीची स्वच्छता करून उपाययोजना करावी अन्यथा येथील नगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना अळीमिश्रित पाणी पाजून आंघोळ घालण्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी दिला होता.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने याची दखल घेत तातडीने यावर उपाययोजना केल्या आहेत. काही ठिकाणी असलेली गळती काढून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. पालिकेने तातडीने कार्यवाही केल्याने प्रभाग सहा मधील नागरिकांसह मनसेने समाधान व्यक्त केले आहे.

