Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे गडहिंग्लजला धरणे आंदोलन

महामार्गाची वहिवाट मोजणी दिनांक 31 जानेवारी रोजी करणार

राष्ट्रीय महामार्ग उप अभियंता यांनी  काढले पत्र; आंदोलन तात्पुरते स्थगित 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेच्या वतीने गडहिंग्लज प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी केले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता टी. एस. शिरगुप्पे यांनी महामार्गाची वहीवाट मोजणी दिनांक ३१ जानेवारी रोजी करण्याचे लेखी पत्र दिल्याने सदर बेमुदत धरणे आंदोलन पुन्हा तात्पुरते स्थगित करण्यात आले.

संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी  दिनांक ९ जानेवारी रोजी धरणे आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, उपविभागीय अधिकारी यांच्या दालनामध्ये बैठक झाल्यानंतर सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचे सुचित केले होते. उपविभागीय अधिकारी यांच्या विनंतीला मान देऊन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर दिनांक १२ जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये महामार्ग विभागाचे अधिकारी यांनी बैठकीचे इतिवृत्त देण्याचे मान्य केले होते मात्र ते  संघटनेला प्राप्त झाले नव्हते. तसेच ३० ते ४० ठिकाणी रस्ता मोजण्याचे ठरले होते मात्र मोजणी करण्याबाबत नियोजन अगर कार्यवाही झालेली नव्हती. महामार्ग विभाग रस्त्याची व मोरीचे काम बेकायदेशीर चालू करत आहेत याकडे निवेदनातून प्रांताधिकारी यांचे महामार्ग बाधित संघटनेच्या वतीने लक्ष वेधले होते. बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे  दुर्लक्ष होत असल्याने तात्पुरते स्थगित केलेले धरणे आंदोलन बुधवारी पुन्हा करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता टी.एस.शिरगुप्पे यांनी महामार्ग वहिवाटीची मोजणी ३१ जानेवारी रोजी करण्याचे लेखी पत्र दिल्याने सदर आंदोलन पुन्हा तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.   

यावेळी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव, शिवाजी इंगळे, जयवंत थोरवतकर यांच्यासह महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.