नूतन सरपंच व उपसरपंच यांचा गडहिंग्लज येथे सत्कार सोहळा
सरपंचांनी गावचे कुटुंब प्रमुख म्हणून प्रामाणिक काम करावे: उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे
गटविकास अधिकारी शरद मगर यांनी दिली विविध शासकीय योजनांची माहिती
गडहिंग्लज (प्रतिनिधी): ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी गावच्या शाश्वत विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत असे आवाहन अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
अखिल भारतीय सरपंच परिषदेच्यावतीने नूतन सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार सोहळा बचत भवन येथे संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री. पाटील बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, गटविकास अधिकारी शरद मगर यांची उपस्थिती होती.
प्रमुख अतिथी म्हणून राज्य कार्यकारिणी सदस्य संजय कांबळे, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय बटकडली, कोअर कमिटीचे सल्लागार ॲड.दिग्विजय कुराडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयंत पाटील पुढे म्हणाले, सध्या ग्रामपंचायतींमध्ये उच्चशिक्षित पदाधिकारी असल्याने खेड्यांचा विकास होण्यास मदत होत आहे. सरपंचपद हे फार मौल्यवान असून सरपंचांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. शासनानेही ग्रामपंचायतींना मुबलक निधी उपलब्ध करून देऊन सर्व गावांना समान न्याय द्यावा अशी मागणी केली. सरपंचांना जास्तीत जास्त अधिकार मिळावेत. गावच्या विकास कामासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीपूर्वी सरपंच संघटनेच्या वतीने मुंबई येथे 'अपेक्षा मोर्चा' काढण्यात येणार असल्याचे देखील श्री.पाटील यांनी सांगितले. यावेळी श्री. पाटील यांनी महाराष्ट्रातील विविध गावांची आदर्श ग्रामगाथा नूतन सरपंच व उपसरपंच यांना सांगितली.
प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी सरपंचांनी गावचे कुटुंब प्रमुख म्हणून प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले. तर गटविकास अधिकारी शरद मगर यांनी विविध शासकीय योजनांची माहिती नूतन सरपंच व उपसरपंच यांना करून दिली.
ॲड. दिग्विजय कुराडे व अक्षय पाटील यांची गोडसाखर साखर कारखाना संचालकपदी निवड झाल्याबद्दल, तर संदीप धनवडे व साताप्पा कांबळे यांची कोल्हापूर जिल्हा ग्रामसेवक पतसंस्था संचालकपदी निवड झाल्याबद्दल, गुरु गुरव यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्धल तर राजन दड्डीकर यांना विस्तार अधिकारी पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
नूतन सरपंच यांच्या वतीने गिरीजादेवी शिंदी-नेसरीकर यांनी तर सरपंच परिषदेच्या वतीने संजय कांबळे यांनी मनोगतेे व्यक्त केली. सदर कार्यक्रमावेळी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांनां ओळखपत्रे वाटप करुन मान्यवरांच्या हस्ते पुस्तके व रोप देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत तालुका अध्यक्ष बसवराज आरबोळे, प्रास्ताविक कार्याध्यक्ष सचिन देसाई, सूत्रसंचालन आयाज बागवान यांनी केले. आभार ॲड.दिग्विजय कुराडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप पाटील-औरनाळकर, रवींद्र घेजी, दिनकर वळतकर, विकास मोकाशी, आशिष साखरे, उत्तम कांबळे, प्रियांका यादव, ज्ञानप्रकाश रेडेकर यांनी परिश्रम घेतले.



