उमेदवार संतोष लोकरे यांचा सवाल
संस्थेतून प्रचार करणे हे नियमबाह्य
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुका सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सुरू असताना सत्ताधारी पॅनल विरार पूर्व येथील शाखेतून निवडणुकीचा प्रचार करत असून या कामासाठी कर्मचाऱ्यांनाही जुंपले जात असल्याचा आरोप श्री. महाकाली परिवर्तन सहकार पॅनलचे उमेदवार संतोष लोकरे यांनी केला आहे.
यावेळी माहिती देताना संतोष लोकरे यांनी म्हटले आहे की, पतपेढी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरू आहे. असे असताना देखील पतपेढीच्या विरार पूर्व येथील शाखेतून सत्ताधारी मंडळींनी आपली प्रचार यंत्रणा कार्यान्वित केली आहे. आमच्या हाती या शाखेतून प्रचाराचे साहित्य देखील लागले आहे. प्रत्यक्ष त्या शाखेत जाऊन आम्ही हा त्यांच्या कारभार उघडकीस आणला आहे.
प्रचारासाठी कर्मचाऱ्यांनाही कामाला लावले जात असून हे नियमबाह्य आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या सभासद मतदार यादीमध्ये मतदारांचे संपर्क क्रमांक आहेत मात्र आपल्याकडे दिलेल्या यादीत संपर्क क्रमांक दिलेले नाहीत. हे जाणून-बुजून केल्याचा आरोप देखील श्री.लोकरे यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे हा मनमानी कारभार हाणून पाडण्यासाठी परिवर्तनाची गरज असून सभासदांनी श्री. महाकाली परिवर्तन सहकार पॅनलला साथ द्यावी असे आवाहन श्री. लोकरे यांनी केले आहे.

