गडहिंग्लज (प्रतिनिधी): संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेच्या वतीने स्थगित करण्यात आलेले बेमुदत धरणे आंदोलन उद्या दिनांक २५ जानेवारीपासून पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी दिली. या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक ९ जानेवारी रोजी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, उपविभागीय अधिकारी यांच्या दालनामध्ये बैठक झाल्यानंतर सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचे सुचित केले होते. उपविभागीय अधिकारी यांच्या विनंतीला मान देऊन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर दिनांक १२ जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये महामार्ग विभागाचे अधिकारी यांनी बैठकीचे इतिवृत्त देण्याचे मान्य केले होते मात्र ते अद्याप संघटनेला प्राप्त झालेले नाही. तसेच ३० ते ४० ठिकाणी रस्ता मोजण्याचे ठरले होते मात्र मोजणी करण्याबाबत अद्याप नियोजन अगर कार्यवाही झालेली नाही. महामार्ग विभाग दादागिरी करून रस्त्याची व मोरीचे काम बेकायदेशीर चालू करत आहेत. बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने तात्पुरते स्थगित केलेले धरणे आंदोलन दिनांक २५ जानेवारीपासून पुन्हा सुरू करत आहोत असे म्हटले आहे.
या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव, कॉम्रेड संजय तर्डेकर, शिवाजी इंगळे, जयवंत थोरवतकर,अनिल सुतार, ऋषिकेश सुतार आदींच्या सह्या आहेत.

