Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बेळगाव- वेंगुर्ला राज्यमार्ग हा राष्ट्रीय महामार्ग व्हावा!

स्वाभिमानी शेतकरी संघटना, उद्योजक व नागरिकांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन 


कोल्हापूर (प्रतिनिधी):
बेळगांव - वेंगुर्ला राज्यमार्गाची दर्जोन्नती करून राष्ट्रीय महामार्ग करण्याच्या दृष्टीने विचार व्हावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना, सीमा भागातील उद्योजक, व्यापारी व नागरिक यांच्यावतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत  राज्य सचिव राजेंद्र गड्यानावर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते व वाहतूक, राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना कोल्हापूर दौऱ्याप्रसंगी  प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, राज्यमार्ग क्रमांक १८० हा बेळगांव- वेंगुर्ला असा असून कोल्हापूर, सिंधुदुर्ग व कर्नाटकातील बेळगांव जिल्हा तसेच जुना एन.एच -4 पुणे -बंगलोर हायवे, 11-17 पणजी -मुंबई या महामार्गाला जोडणारा कॉरीडोर आहे. वेंगुर्ला  ते बेळगांव १२३.२ किलो मीटर असून महाराष्ट्रातील हद्द ११०.८ तर कर्नाटकातील हद्द १४.०९ किलोमीटर इतका आहे. बेळगाव हे एक मोठे औद्योगिक महानगर असून ऐतिहासिक, पर्यटनशील, प्रचंड मोठी सर्वसोयीनियुक्‍त बाजारपेठ तसेच आरोग्य, शैक्षणिक, उद्योगाचे केंद्र (हब)आहे. देशातील एक महत्वाचे लष्करी केंद्र बेळगांवमध्ये आहे.

पूर्वीपासून महाराष्ट्रातील, तळकोकणातील दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण तसेच कोल्हापूर जिल्हयातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज या सर्व तालुक्‍यातील लोक मोठया प्रमाणात सदर रस्त्याने ये- जा करित असतात. तसेच शेतीमाल, भाजीपाला, किराणामाल याची मोठया प्रमाणात ने आण होत असते. कोकणातील हापूस आंब्याची, सागरी किनारऱ्यावरील माशांची ने-आण तसेच गोव्याला जाणारे पर्यटक ये-जा करिता असतात. कारण अंबोली हा घाटमार्ग अत्यंत सुरक्षित समजला जातो. त्यातच अलीकडे रेड्डी बंदर होत आहे. नुकतेच गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्हयाच्या सीमेवर चिपी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होत आहे. यामुळे भविष्यात कर्नाटकातील, धारवाड, गदग, बेळगाव, विजापूर महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ये-जा करण्याच्या दृष्टीने अतिशय जवळचे विमानतळ ठरणार आहे. या जिल्ह्यातील शेतमाल साखर निर्यात करण्याच्या दृष्टीने सावंतवाडीजवळ नियोजित रेड्डी व आरोंदा ही बंदरे होत आहेत. दक्षिण कोल्हापूर (आजरा, गडहिंग्लज, चंदगड) व बेळगाव परिसरातील छोट्या- मोठ्या काजू उद्योजकांना काजू आयात- निर्यात करण्याच्या दृष्टीने सोयीचे होणार आहे. सदर रस्त्यासाठी आजरा, गडहिंग्लज, चंदगड या विभागातील पाच ते सहा साखर कारखान्याची ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून हा रस्ता सध्या वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीचा ठरत आहे.

सदर रस्त्यालगत चंदगड तालुक्यातील हलकर्णी व शिनोळी असे दोन औद्योगिक वसाहती आहेत. सध्या या रस्त्यावरील डांबरी रस्ता ५.५ मीटरचा असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे २४ मीटर रुंदीची जमीन ताब्यात आहे असे समजते. भविष्यात सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विचार होऊन सदर राज्यमार्गाची दर्जोन्नती करून राष्ट्रीयमार्ग होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून केले आहे. या निवेदनावर राजेंद्र गड्यानावर, शिवाजी भोगण, अजित तुरटे, यशवंत इंजल, दत्तात्रय मोहिते, सुयोग जाधव आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.