आमदार राजेश पाटील यांची माहिती
सुळे येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): चंदगड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाला कोणत्या ना कोणत्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न केला आहे. गट तट बाजूला ठेवून विकास कामांना प्राधान्य दिलो आहे. गेल्या तीन वर्षात चंदगड विधानसभा मतदारसंघात जवळपास ४०० कोटी रुपयांची विकास कामे झाली आहेत. अशी माहिती आमदार राजेश पाटील यांनी सुळे येथील कार्यक्रमात दिली.
आजरा तालुक्यातील सुळे येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी होते. यावेळी सुळेकर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष राजाराम मांगले, माजी जि.प. सदस्य सुनिता रेडेकर, नगरसेवक अभिषेक शिंपी, सरपंच सचिन देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी जलजीवन मशीन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना, अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण, प्राथमिक शाळेतील स्वच्छतागृह, शाळा सुशोभीकरण, गटर्स व रस्ता, प्राथमिक आरोग्य केंद्र नूतनिकरण अशा ६६ लाख ७० हजार रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार पाटील पुढे म्हणाले, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी ४५ लाख ९५ हजार, सुळे- हंदेवाडी ग्रामीण मार्गासाठी १५ लाख तसेच अंतर्गत रस्त्यांसाठी आठ लाखांचा निधी देण्यात आला. सुळे ग्रामपंचायत कार्यालयासाठी यापूर्वी १५ लाख मंजूर करण्यात आले आहेत मात्र अद्याप हा निधी मिळाला नसल्याचे समजले यासाठीही पाठपुरावा केला जाईल. माजी आमदार कै. नरसिंगराव पाटील, कै. सदाशिवराव मंडलिक, कै. बाबासाहेब कुपेकर हे जिवलग मित्र होते. आपल्या कामाचा एक वेगळा ठसा त्यांनी महाराष्ट्रात उमटवला आहे. त्यांचाच आदर्श ठेवून आज माझी वाटचाल सुरू आहे. मतदार संघात कोणतीही विकास कामे करताना मी कधी गट-तट पाहिलेलो नाही आणि पाहणारही नाही.
आमदार पाटील पुढे म्हणाले, आजरा साखर कारखाना उभारण्यात कै. नरसिंगराव पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. हा कारखाना आंबोली येथे होणार होता मात्र माजी आमदार नरसिंगराव पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना हा कारखाना आंबोलीत झाल्यास आपण आंदोलन छेडू असे ठणकावून सांगितल्याने हा कारखाना आंबोली ऐवजी आजरा तालुक्यातील गवसे येथे झाला. या घटनेचा मी स्वतः साक्षीदार असल्याचे सांगितले.
गेली पंचवीस वर्षे रखडलेल्या आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावल्याचे सांगून हा प्रश्न मार्गी लावण्यात राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, आमदार हसन मुश्रीफ, जयंत पाटील यांचेही मोठे योगदान असल्याचे आवर्जून सांगत उचंगी प्रकल्पाचा पाया कै. बाबासाहेब कुपेकर यांनी रचला व त्यावर कळस चढवण्याचे(पूर्णत्वास नेण्याचे) काम आमदार जयंत पाटील यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. आजरा तालुक्यातील उचंगी, सर्फनाला, आंबेओहोळ या प्रकल्पांचे प्रश्न सुटल्याशिवाय आजरा साखर कारखाना उसाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार नाही हे ओळखून ह्या प्रकल्पांचे प्रश्न प्रामुख्याने मार्गी लावण्याचे काम केल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. यापुढील काळातही सर्वाधिक विकासकामे होण्यासाठी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये जनतेने राष्ट्रवादीला पाठबळ द्यावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले. यावेळी राजाराम जाधव, राजाराम मांगले, जयवंतराव शिंपी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास सरपंच छाया सूर्यवंशी, उपसरपंच सतीश फडके, ग्रामपंचायत सदस्य संदीप चव्हाण, शिवाजी सुतार, जयश्री फडके, शिल्पा डोंगरे, शांताबाई सुतार, ग्रामसेवक सागर किरुळकर, अमित फडके, बाबुराव फडके, आनंदा पोवार, सागरभाऊ देसाई, संभाजी रेडेकर, नारायण मांगले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक संदीप चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन प्रकाश चौगुले यांनी केले. आभार सरपंच छाया सूर्यवंशी यांनी मानले.



