Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गांधीजींच्या विचारांचे आचरण विद्यार्थ्यांनी केले पाहिजे : प्राचार्य कल्याणराव पुजारी

                            (छायाचित्र: मज्जिद किल्लेदार)

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
महात्मा गांधी यांचे विचार विद्यार्थ्यांनी  समजून घेणे आवश्यक आहे. गांधीजींच्या विचारांचे आचरण विद्यार्थ्यांनी केले पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य कल्याणराव पुजारी यांनी केले.

येथील शिवराज विद्यालयात  'महात्मा गांधी मंच गडहिंग्लज' आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आजरा साखर कारखान्याचे चेअरमन प्रा. सुनील शिंत्रे होते. यावेळी  'महात्मा गांधी यांच्या विचारांचा जागर' या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

प्रारंभी शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे  यांनी स्वागत करून प्रास्ताविकातून गांधी विचारांचा जागर करणे काळाची गरज आहे. नव्या पिढीला गांधी समजणे आवश्यक आहे या उदात्त हेतूने शंभर व्याख्याने घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी ' 'अहिंसक सत्याग्रह' या विषयावर मार्गदर्शन करताना प्राचार्य पुजारी म्हणाले, अहिंसक सत्याग्रह हा स्वराज्य शक्तीचा मार्ग आहे. महात्मा गांधीजीनी माणसांमध्ये देव पाहीले आहे. 35 कोटी भारतीय जनतेचे आत्मबळ देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकवटीत करण्याचे महान कार्य गांधीजीनी केले. आपल्या देशात ब्रिटिशांनी मिठावर लादलेला जुलुमी कर हा भारतीय जनतेवर अन्याय करणारा होता. जनतेची पिळवणूक करण्याच्या या अन्यायी धोरणाला विरोध करण्यासाठी गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. हा सत्याग्रह पुढे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला खऱ्याअर्थी बळ देणारा ठरला आहे. आजही महात्मा गांधी यांच्या विचारांचा जागर संपूर्ण जगभर होत आहे. म्हणूनच 145 देशामध्ये महात्मा गांधीजींचे पुतळे उभारण्यात आली आहेत. महात्मा गांधी यांनी केलेल्या महान कार्यांचा आदर्श आज संपूर्ण जगासमोर आहे.

                        (छायाचित्र: मज्जिद किल्लेदार)

यावेळी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, प्रा.सुनील शिंत्रे यांनीही महात्मा गांधी यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्रा.पी.डी, पाटील, प्रा.कमलाकर, प्रा.ईश्वर दावणे, प्रा. पट्टणशेट्टी यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आशा पाटील यांनी केले. आभार प्रा.संतोष पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.