स्वतंत्र अतिदक्षता विभाग
शासकीय मोफत योजना मंजूर
![]() |
| महागाव: येथील संत गजानन महाराज कार्डिॲक सेंटरमधील तज्ञ व अनुभवी डॉक्टरांच्या टीम सोबत डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. रमेश माळकर व इतर कर्मचारी वर्ग. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (ता.गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज मल्टी स्पेशलिटी रुग्णालयात हृदयविकार रुग्णांच्या चिकित्सा व उपचारासाठी स्वतंत्र कार्डिॲक सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी अत्याधुनिक मशीनसह स्वतंत्र कॅथलॅबची उभारणी केली असून प्रदीर्घ अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर्स चोवीस तास येथे उपलब्ध असणार आहेत. तसेच ॲजिंओग्राफी व ॲजिंओप्लास्टीसाठी शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य व कर्नाटकचे सुवर्ण आरोग्य योजनेला मंजुरी मिळाल्याची माहिती डॉ. यशवंत चव्हाण यांनी दिली.
गेली पंचवीस वर्षे गरजू व सर्वसामान्यांच्या उपचाराकरिता संत गजानन महाराज रुग्णालय नामांकित रुग्णालयापैकी एक आहे. या विभागातील हृदयविकार रुग्णांची गांभीर्य ओळखून सामान्य रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी या सेंटरची सुरुवात केली आहे. नुकताच या सेंटर मधून ट्रिपल वेसल असलेली अवघड व जोखीमेची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात यश मिळाले आहे. यासाठी नामवंत डॉ. रमेश माळकर यासह इतर तज्ञ डॉक्टर्स व परिचारिकेच्या टीमची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. माळकर हे एमबीबीएस कृष्णा मेडिकल सायन्स (कराड) डीएनबी मेडिसिन कोचीन (केरळ) तर डीएनबी कार्डिओलॉजी पुट्टपर्थी (आंध्र प्रदेश) येथे शिक्षण पूर्ण करुन दहा वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले पंधरा हजार अँजिओप्लास्टी तर तीस हजारहून अधिक अँजिओग्राफीची शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे.
याबरोबरच डॉ. प्रियांका पाटील, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, सुशांत पाटील यासह इतर डॉक्टरांची टीम येथे उपलब्ध असणार आहे. तरी गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. यशवंत चव्हाण यांनी केले आहे.


