1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अन्य देशांतर्गत जलमार्ग प्रकल्पांचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उदघाटन
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे वाराणसी येथे जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ-एमव्ही गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवला आणि टेंट सिटीचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात त्यांनी 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अन्य देशांतर्गत जलमार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील केली.
एमव्ही गंगा विलास नेमके कसे आहे 👇🏼
एमव्ही गंगा विलास ही प्रवासी नौका उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून आपल्या प्रवासाचा आरंभ करेल आणि 51 दिवसात सुमारे 3,200 किमी प्रवास पूर्ण करत,भारत आणि बांगलादेशातील 27 नदी प्रवाह ओलांडत बांगलादेशमार्गे आसाममधील दिब्रुगढला पोहोचेल. एमव्ही गंगा विलास मध्ये तीन डेक, 18 निवासी खोल्या आहेत. त्यात सर्व आरामदायक सुविधा आहेत. या नौकेच्या संपूर्ण कालावधीच्या प्रवासासाठी स्वित्झर्लंडमधील 32 पर्यटकांना पहिली संधी मिळाली आहे.
एमव्ही गंगा विलास क्रूझ ही देशातील सर्वोत्कृष्ट प्रेक्षणीय स्थळे जगासमोर आणण्यासाठी तयार केली आहे. जागतिक वारसा स्थळे, राष्ट्रीय उद्याने, नद्यांवरील घाट तसेच बिहारमधील पाटणा, झारखंडमधील साहिबगंज, पश्चिम बंगालमधील कोलकाता, बांगलादेशातील ढाका आणि आसाममधील गुवाहाटी यासारख्या प्रमुख शहरांसह 50 पर्यटन स्थळांना भेटी देत, 51 दिवसांच्या नौका पर्यटनाचे नियोजन यात करण्यात आले आहे. या प्रवासामुळे पर्यटकांना भारत आणि बांगलादेशातील कला, संस्कृती, इतिहास आणि आध्यात्मिक आनंदात सहभागी होण्याची आणि प्रवासाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
रिव्हर क्रूझ पर्यटनाला चालना देण्याच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने, नदी पर्यटनांची अद्याप योग्य प्रकारे वापर न झालेली क्षमता ही सेवा सुरू झाल्याने वापरात येईल आणि ती भारतासाठी नदी क्रूझ पर्यटनाच्या नवीन युगाची सुरुवात करेल.
वाराणसी येथे टेंट सिटी👆
या प्रदेशातील पर्यटनाच्या संभाव्य संधींचा फायदा घेण्यासाठी गंगा नदीच्या काठावर टेंट सिटीची संकल्पना मांडण्यात आली आहे. हा प्रकल्प शहरातील घाटांच्या समोर विकसित करण्यात आला आहे जो निवास सुविधा प्रदान करेल आणि विशेषत:काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनानंतर, वाराणसीमध्ये वाढलेल्या पर्यटकांच्या मागणीची पूर्तता करेल, ही टेन्ट सिटी वाराणसी विकास प्राधिकरणाने पीपीपी (सार्वजनिक खाजगी भागीदारी) च्या माध्यमातून विकसित केली आहे. परिसरातील विविध घाटांवरून बोटीने पर्यटक टेंट सिटीमध्ये पोहोचतील. दरवर्षी ऑक्टोबर ते जून या कालावधीत टेंट सिटी कार्यान्वित होणार असून पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने तीन महिन्यांसाठी ती तात्पुरती काढून टाकली जाईल.
अंतर्देशीय जलमार्ग प्रकल्प
पंतप्रधान पश्चिम बंगालमधील हल्दिया मल्टी-मोडल टर्मिनलचे उद्घाटन करतील. जलमार्ग विकास प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या, हल्दिया मल्टी-मोडल टर्मिनलची मालवाहतूक क्षमता सुमारे 3 दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष (MMTPA) आहे आणि बर्थ सुमारे 3000 डेडवेट टनेज (DWT) पर्यंत जहाजे हाताळण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.
पंतप्रधानांनी गाझीपूर जिल्ह्यातील सैदपूर, चोचकपूर, झामानिया आणि उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील कानसपूर येथे चार तरंगत्या कम्युनिटी जेटींचे उद्घाटन केले. याशिवाय, पंतप्रधानांनी दिघा, नक्त दियारा, बारह, पाटणा जिल्ह्यातील पानापूर आणि बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर येथे पाच कम्युनिटी जेटींची पायाभरणी केली. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये गंगा नदीच्या काठावर 60 हून अधिक सामुदायिक (कम्युनिटी)जेटी बांधल्या जात आहेत ज्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि स्थानिक समुदायांचे जीवनमान सुधारेल. या सामुदायिक जेटी, लहान शेतकरी, मत्स्यपालन करणारे घटक, असंघटित शेत-उत्पादक घटक,
बागायतदार, फुलविक्रेते आणि गंगा नदीच्या आसपासच्या भागात आर्थिक विकसाशी निगडित व्यवसायावर लक्ष केंद्रित करणाऱ्यांना साधे वाहतुकीचे पर्याय प्रदान करून लोकांचे जीवनमान सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.
पंतप्रधानांनी गुवाहाटी येथे ईशान्येसाठी सागरी कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटनही केले. हे केंद्र ईशान्येकडील प्रदेशातील समृद्ध प्रतिभासंचय वाढवण्यास मदत करेल आणि वाढत्या लॉजिस्टिक उद्योगात रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देईल.
या व्यतिरिक्त, पंतप्रधानांनी गुवाहाटी येथील पांडू टर्मिनल येथे जहाज दुरुस्ती सुविधा आणि उन्नत रस्त्याची पायाभरणी केली. पांडू टर्मिनलवरील जहाज दुरुस्ती सुविधेमुळे मौल्यवान अशा वेळेची बचत होईल कारण जहाजाला कोलकाता येथील दुरुस्ती सुविधेपर्यंत नेण्यासाठी आणि परत जाण्यासाठी एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागतो. याशिवाय, या सुविधेमुळे पैशांच्या बाबतीतही मोठी बचत होणार असल्याने जहाजाचा वाहतूक खर्चही वाचणार आहे. पांडू टर्मिनलला राष्ट्रीय महामार्ग एनएच 27(NH 27) ला जोडणारा कायमस्वरूपी रस्ता 24 तास कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.



