मोटार वाहन निरीक्षक इंद्रजीत आमते
गडहिंग्लज (प्रतिनिधी): सध्याच्या धावपळीच्या युगात आपण सर्वजण वावरत आहोत. सर्वत्र रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. वाढत्या रहदारीमुळे आपण सर्वांनी सुरक्षित असा प्रवास करणे गरजेचे आहे. त्यासाठी रस्ता सुरेक्षेचे नियम पाळणे गरजेचे आहे. सर्वांनी वाहने जपून चालवावीत. १८ वर्षाच्या आतील मुलांना पालकांनी आपली वाहने चालविण्यास देऊ नयेत याची खबरदारी घ्यावी. वाहन चालविताना आपल्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणे अत्यंत जरुरीचे आहे. असे प्रतिपादन मोटार वाहन निरीक्षक इंद्रजीत आमते यांनी केले.
येथील शिवराज महाविद्यालयात क्रीडा व एन.सी.सी.विभाग यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एकदिवशीय कार्यशाळेत 'प्रादेशिक परिवहन विकास कोल्हापूर' यांच्या मार्फत सुरु करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा सप्नाह अंतर्गत प्रबोधनामध्ये बीजभाषणात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम तर संस्थेचे सचिव डॉ.अनिल कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक डॉ.श्रद्धा पाटील यांनी केले. यावेळी मोटार वाहन निरीक्षक सागर भोसले, सचिव डॉ.अनिल कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी वाहतुक सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी वाहन सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन विकास यांच्या मार्फत तयार करण्यात आलेल्या माहितीपर चित्रफित दाखविण्यात आले. या कार्यक्रमास प्रा.जयवंत पाटील यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय, एन.सी.सी.कॅडेट, खेळाडू, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.आभार एन.सी.सी.विभाग कॅप्टन डॉ.राहुल मगदूम यांनी मानले.


