महामार्ग उपविभाग व कंपनी कार्यालयाच्या दारात बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): संकेश्वर - बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आपल्या न्याय मागण्यांसाठी सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी महामार्ग उपविभाग व कंपनी कार्यालयाच्या दारात बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. अशी माहिती महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी दिली.
निवेदनात म्हटले आहे की, संकेश्वर - बांदा महामार्ग शेतकऱ्यांच्या हद्दीत बेकायदेशीर चालू असणारे काम बंद करून नुकसान भरपाईबाबत बैठक बोलवण्यासाठी व दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी प्रांताधिकारी, गडहिंग्लज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीचे इतिवृत्त मिळाले नाही. तसेच वळण रस्ता सरळ करण्यासाठी नव्याने संपादन कराव्या लागणाऱ्या जमिनीला किती मोबदला देणार? याची स्पष्टता नाही. वीस वर्ष वहिवाटीचा रस्ता साडेपाच मीटर म्हणजे साडेसोळा फुट सोडून जादा लागणारा रस्ता कोणत्याही प्रकारची नोटीस न देता अगर मोबदला न देता काम चालू केले आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे किती रुंदीचा रस्ता जमीन आहे त्याचे पुरावे दाखवण्यात यावेत, शेतकरी आपले सातबारा व नकाशे घेऊन आंदोलनात सहभागी होणार आहेत. भूसंपादन अधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. आंदोलना दिवशी सर्व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे व चर्चा करावी चर्चेतून मार्ग निघेल. शेतकऱ्यांची फसवणूक करू नये. महामार्ग होण्याला आमचा विरोध नाही, जमीन मालकाची जमीन कायदेशीर संपादन करावी व मोबदला द्यावा या व इतर मागणीसाठी दिनांक 20 फेब्रुवारीला राष्ट्रीय महामार्ग विभाग व एल एन मालविया इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड प्रोजेक्ट ऑफिस गडहिंग्लज येथील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करणार असून आंदोलनाची दखल न घेतल्यास काम बंद करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे.
निवेदनावर कॉम्रेड शिवाजी गुरव, जयवंत थोरवतकर, शिवाजी कदम, अनिल शिंदे, वसंत उबारे, हरिराम चव्हाण, शिवाजी देसाई, रमेश गायकवाड, श्रीधर कदम आदींच्या सह्या आहेत.

