Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागावच्या महात्मा फुले विद्यालयात विद्यार्थी गिरवितात शेतीचे धडे

'फाली' संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना आळंबी उत्पादनाचे प्रात्यक्षि


गडहिंग्लज(प्रतिनिधी):
शेती हा शाश्वत व्यवसाय होऊ शकतो. हा आत्मविश्वास पेरण्याचे  काम ' फाली ' (फ्युचर एग्रीकल्चर लीडरशिप ऑफ इंडिया) ही स्वयंसेवी संस्था करत आहे.आज वास्तवात शेती परवडत नाही. हे तरुण विद्यार्थ्यावर बिंबवल्यामुळे शेती व्यवसायात स्वारस्य नाही. काळाच्या बरोबर जे बदल जुन्या पिढीने केले नाहीत. त्यांना नवीन पद्धतीचे फायदे अनुभवता आले नाहीत. हे वास्तव बदलण्याचा ध्यास फाली या संस्थेने घेतला आहे.भावी पिढीना शेती व्यवसायात आकर्षक करणे, ग्रामीण युवकांना तांत्रिक, औद्योगिक आणि कौशल्यपूर्ण आधुनिक प्रशिक्षण देणे, शेतकऱ्यांच्या मुलांना संस्कार शेतीचे महत्व पटवून दिल्याशिवाय शेती उद्योग भरभराटीला येणार नाही. यासाठी शेती विषयक वेगवेगळे प्रयोग या संस्थेकडून केले जातात. महागावच्या महात्मा फुले विद्यालयात या संस्थेमार्फत आळंबी उत्पादन प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.यासाठी संस्थेचे समन्वयक प्रथमेश शेळके यांनी प्रत्यक्ष कृती करून दाखवले.

या प्रात्यक्षिकासाठी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठातून कोळंबीचे बियाणे मागवले. प्रत्यक्ष कृती करताना कोळंबी ही बुरशीजन्य असल्याने सदरची जागा निर्जंतूक करण्यात आली. पाच किलोच्या पिशवीत एक किलो गवतासाठी ३० ग्रॅम बिया घेतल्या. आदल्या दिवशी गवताचे पिंजर बारीक  करून रात्रभर पाण्यात ठेवले व सकाळी गरम पाण्यातून बाहेर काढून कोरडे केले.पिशवीत ठेवताना पिंजर व बिया यांचे एकावर एक तीन ते चार थर ठेवून पिशवीचे तोंड घट्ट बंद केले.ती तोंड बंद केलेली पिशवी थंड हवेच्या ठिकाणी २१  दिवस ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सदरची पिशवी पूर्ण पांढरी झाल्यानंतर तिचे तोंड उघडल्यानंतर दोन दिवसात पूर्ण वाढ झालेली आळंबी तयार होणार आहेत.

अशा पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांनी आळंबीची पिशवी तयार करून ठेवली आहे. यातून विद्यार्थ्यांना आधुनिक शेती  विषयक ज्ञान मिळणार आहे. शिवाय याचा फायदा विद्यार्थ्यामार्फत पालकांनाही होणार आहे.भविष्यात ऊस या पिकाला पर्यायी नगदी पीक म्हणून पाहिले जाऊ शकते.

यावेळी पर्यवेक्षक अशोक नांदुलकर, प्रा.शिवाजीराव होडगे, प्रा.पी.डी. पाटील, प्रा.संजय मर्णहोळकर ,प्रा. मुकुंद मांढरे, सुभाष सुतार, संदेश कोकितकर, भीमराव भुईबर आदी शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.