गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज- चंदगड राज्य मार्गावर महागाव गावच्या हद्दीत दुपारी साडेबाराच्या दरम्यान रस्त्याकडेला असणारे झाड कोसळल्याने दुचाकीवरून जाणारे मलिग्रे येथील अशोक बुगडे व सुरेखा बुगडे हे दांपत्य जखमी झाले. झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ग्रामस्थ व सार्वजनिक बांधकामच्या कर्मचाऱ्यांनी झाड तातडीने हटविल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, महागाव येथील पाच रस्ता ते डीएड कॉलेज दरम्यानच्या रस्त्यावरून गडहिंग्लजकडे दुचाकीवरून सदर दांपत्य जात होते. याच दरम्यान या मार्गावर जाधव यांच्या शेतानजीक रस्त्याकडेला जीर्ण झालेले झाड अचानक कोसळले. हे झाड दुचाकीवरून जात असलेल्या दांपत्यावरच कोसळल्याने ते जखमी झाले. त्यांना तातडीने महागाव येथील ग्रामस्थांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व ग्रामस्थांनी सदर झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.

