गडहिंग्लज (प्रतिनिधी): वैरागवाडी येथे बांधकाम सुरक्षा किट वाटप, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार, विधवा महिलांचा सन्मान व बचत गटातील महिलांना मार्गदर्शन असा संयुक्त कार्यक्रम पंचायत समितीचे माजी सदस्य अमर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. अध्यक्षस्थानी सरपंच पी. के.पाटील होते.
यावेळी बोलताना अमर चव्हाण म्हणाले, बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी एकत्रित यावे व लघु उद्योग स्थापन करून स्वयंरोजगाराची निर्मिती करावी. बचत गटातून उन्नती साधत स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतः सह कुटुंबालाही सक्षम करावे. सध्या बचत गटाच्या चळवळीने गती घेतली आहे. या माध्यमातून महिलांनी विविध रोजगार गावागावात निर्माण करावेत. रोजगाराबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगून यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बांधकाम सुरक्षा किटमुळे विविध जोखमीची कामे करताना कामगारांना सुरक्षितता मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून वैरागवाडी गाव तालुक्यात एक आदर्श गाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही श्री.चव्हाण यांनी यावेळी दिली.
यावेळी महात्मा फुले विकास सेवा सोसायटीमार्फत नूतन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बचत गटाचे अधिकारी बी.एन.चौगुले , सौ.दड्डी यांनी बचत गटाच्या विविध योजनांची माहिती सांगितली. तसेच रेखा पाटील यांनी विधवा महिलांचा सन्मान केला.
कार्यक्रमास उपसरपंच सुनील पाटील, ग्रा. पं. सदस्य उत्तम पाटील, मारुती गोते, मीरा पाटील, सुनिता पांडुरंग पाटील,सुनिता गणपती पाटील, स्नेह बिरंजे, ग्रामसेवक विठ्ठल कुंभार,हरळीचे माजी सरपंच प्रदीप पाटील, बाबुराव माने, प्रा. डी. एन. पाटील, रवींद्र पाटील, संदीप पाटील, बजरंग पाटील, संभाजी पाटील, अशोक पाटील, कृष्णा पाटील, चंद्रकांत पाटील, सुजय पाटील,युवराज बिरंजे यांच्यासह विविध महिला गटाच्या अध्यक्ष व सदस्या, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय कुंभार यांनी केले. आभार एकता पाटील यांनी मानले.


