Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रात सहकाराचे जाळे मजबूत: केंद्रीय मंत्री अमित शहा

पुण्यामध्ये आयोजित दोन दिवसीय सहकार महापरिषदेचा समारोप 


पुणे :
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सहकार क्षेत्रातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात सहकार अतिशय जुना आणि मजबूत आहे कारण सहकार हा महाराष्ट्राचा स्थायीभाव राहिलेला आहे आणि संपूर्ण देशात सहकाराचा प्रसार करण्यात महाराष्ट्र राज्याने खूप मोठे योगदान दिले आहे. असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केले.

पुण्यामध्ये दैनिक सकाळ समूहाकडून आयोजित दोन दिवसीय सहकार महापरिषदेच्या समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री शहा उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्री अतुल सावे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रवीण दरेकर, सकाळ समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सहकार मंत्री शहा म्हणाले की, केंद्रातील नरेंद्र मोदीजींचे सरकार सहकार क्षेत्रातल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. आज देशात सहकार क्षेत्रामध्ये काही ठराविक राज्ये चांगली कामगिरी करत आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. महाराष्ट्रात सहकार अतिशय जुना आहे कारण सहकार हा महाराष्ट्राचा स्थायीभाव राहिलेला आहे आणि संपूर्ण देशात सहकाराचा प्रसार करण्यामध्ये या राज्याने खूप मोठे योगदान दिले आहे असे त्यांनी सांगितले.

सहकार क्षेत्रातल्या सर्व प्रश्नांवर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका स्वतंत्र्य  सहकार मंत्रालयाची स्थापना केली. सहकारी पतसंस्थांचे एक अतिशय मोठे जाळे आपल्या देशात आहे आणि या जाळ्याने देशातल्या तळागाळातल्या घटकांना आर्थिक विकासासाठी बळ दिले आहे.  येणाऱ्या दशकात सहकार क्षेत्र सर्वात जास्त प्रासंगिक क्षेत्र असेल असं त्यांनी नमूद केलं.

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र खूप मोठे, मजबूत आणि व्यापक आहे. देशातील सुमारे साडेआठ लाख सहकारी संस्थांपैकी एकट्या महाराष्ट्रातच दोन लाख सहकारी संस्था म्हणजेच 67 टक्के सहकारी संस्था आहेत. पशुधन संस्था 35 टक्के, साखर सहकारी संस्था 27टक्के , पणन संस्था 16टक्के ,  मत्स्य उद्योग संस्था चौदा टक्के आणि अन्नप्रक्रियेच्या 11टक्के समित्या महाराष्ट्रात आहेत. याशिवाय महाराष्ट्रा 21टक्के प्राथमिक कृषी पत संस्था(पॅक्स) आहेत आणि एकूण शहरी बँकांच्या 32 टक्के म्हणजे 490 बँका महाराष्ट्रात आहेत. याबरोबरच 6529 बँक शाखा देखील आहेत,  ज्या देशातील एकूण शाखांच्या 60टक्के आहेत. याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्रात सहकार ही खूप मोठी ताकद आहे.  महाराष्ट्रात अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांच्या माध्यमातून सुमारे 3.25 लाख कोटी रुपये जमा आहेत. जे देशाच्या एकूण अर्बन बँकांच्या ठेवीच्या 62टक्के आहेत.

जोपर्यंत देशात मूलभूत प्राथमिक संस्था बळकट होत नाहीत तोपर्यंत सहकार बळकट होणार नाही. यासाठी देशातील 63 हजार पॅक्सना बळकट करण्यासाठी त्यांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.सहकार क्षेत्राला आपल्या कामगिरी बाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि आपल्या विश्वासार्हतेमध्ये वाढ करायला हवी असे ते म्हणाले. आत्मपरीक्षणामुळे सहकारी क्षेत्राला आपल्या व्यवस्थांमध्ये सुधारणा करण्याची आणि आपली जबाबदारी स्वीकारण्याची देखील गरज आहे, असं त्यांनी सांगितले . आता सहकार क्षेत्रासोबत कोणताही अन्याय होऊ शकणार नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार मंत्रालय बनवून सहकारातून समृद्धीचा जो मंत्र दिला आहे त्यामुळे सहकार क्षेत्राची वृद्धी कोणीही थांबू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.