महासंपर्क दौऱ्याला विद्यार्थी व विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सुमारे ४०० च्या वर विद्यार्थ्यांची उपस्थिती
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांचा गडहिंग्लज येथे महासंपर्क दौरा संपन्न झाला. या महासंपर्क दौऱ्यात अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, प्रभात साबळे उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची पुनर्बांधणी करण्यासाठी अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर महासंपर्क दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे गडहिंग्लजसह आजरा, चंदगड दौऱ्यावर होते. दरम्यान गडहिंग्लज येथे दुपारी एक वाजता दसरा चौक येथे श्री. ठाकरे यांचे आगमन झाले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांसह विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. आगमन होताच महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन केले. त्यानंतर विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती रत्नमाला घाळी यांच्या निधनाबद्दल घाळी कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन केले. नंतर सूर्या संस्कृतिक भवन येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.ग्रामीण भागातून सुमारे ४०० वर विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांनी आपल्या मनात असणारी विविध प्रश्ने विचारली. अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देत विद्यार्थ्यांची मने जिंकली.
त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक झाली त्या बैठकीत पक्ष वाढी संदर्भात चर्चा करण्यात आली. मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी महासंपर्क दौऱ्याचे अप्रतिम नियोजन व व्यवस्थापन केले होते. या नियोजनाचे अमित ठाकरे यांनी कौतुक केले.
यावेळी विद्यार्थी सेनेचे प्रभात साबळे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, अमित ठाकरे यांनी इंचनाळ येथील गणेश मंदिराला भेट देत दर्शन घेतले.




