संग्राम संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांची मागणी
आजरा : आंबेओहोळ प्रकल्पातील सर्व धरणग्रस्तांचे अगोदर शंभर टक्के पुनर्वसन करण्यात यावे मगच धरणाच्या वाढीव सांडव्याचे काम करण्यात यावे अशी मागणी संग्राम संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी केली आहे.
आंबेओहळ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष करून अधिक पाणीसाठा करण्यासाठी सांडव्याची उंची वाढवण्याचे काम चालू आहे. मात्र दोनशे शेतकऱ्यांचे पुनर्वसन बाकी आहे. याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाला खिळ बसली आहे. धरणग्रस्त कार्यकर्त्यांना अटक करून धरणात पाणीसाठा करण्यात आला. आता पुनर्वसन न करताच वाढीव सांडव्याचे काम केले जात आहे, हा शेतकऱ्यांच्यावर अन्याय आहे. शंभर टक्के पुनर्वसन करा व मगच सांडव्याचे काम करावे. अशी मागणी श्री. गुरव यांनी केली आहे.
शेतकऱ्यांचा आता संयम सुटत चालला आहे. तातडीने सर्वांचे पुनर्वसन करा अन्यथा निवडणुकीमध्ये वेगळा विचार करावा लागेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. गेली बावीस वर्षे पुनर्वसनाचे काम केलेले नाही. धरणाचे काम मात्र केले जात आहे. ही कोणती लोकशाही आहे? याचे उत्तर लोकप्रतिनिधींनी द्यावे असा सवालही संघटना अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी केला आहे.

