दोन एकरामध्ये १८६ हून अधिक सेंद्रिय पिके
मोठ्या वृक्षांच्यामध्ये घेतले आहेत विविध आंतरपिके
घरच्या घरी तयार केलेली विविध हिरवळी खताचे अनेक नमुने उपलब्ध
सेंद्रिय शेतीचे जिवंत नमुने शेतकऱ्यांना ठरणार मार्गदर्शक
कणेरी मठ (कोल्हापूर): कणेरी येथील सिद्धगिरी संस्थान मठ सेंद्रिय शेतीचे विद्यापीठ म्हटले तर वावगे ठरणार नाही, कारण परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल दोन एकर परिसरात यशस्वी पद्धतीने सेंद्रिय शेती फुलविण्यात आली असून विविध प्रकारची १८६हून अधिक सेंद्रिय पिके येथे घेण्यात आली आहेत. त्यामुळे दिनांक २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान पार पडणारा "सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव" हा शेतकऱ्यांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. पंचमहाभूतातील पृथ्वी तत्वात या सेंद्रिय शेतीची माहिती शेतकऱ्यांना होणार आहे.
या लोकोत्सवात पृथ्वी, पाणी, हवा, अग्नी, आकाश या पंचमहाभूतांचे मनुष्य जातीने रक्षण करून पर्यावरणाचा समतोल कसा राखला पाहिजे याचे सखोल मार्गदर्शन प्रात्यक्षिकातून दिले जाणार आहे. या तत्त्वातीलच एक तत्व म्हणजे पृथ्वीतत्व होय. या पृथ्वीतत्त्वात मातीच्या सर्व गोष्टी, मातीच्या निर्मितीपासून त्याचा होणारा उपयोग, ही माती सुधारण्यासाठी काय केले पाहिजे याचे दहा ते वीस प्रकारचे घरगुती उपाय याचे अचूक मार्गदर्शन शेतकऱ्यांना होण्यास मदत होणार आहे.
श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली सिद्धगिरी संस्थान मठाने जवळपास दोन एकर परिसरात सेंद्रिय पद्धतीने पिके घेतली आहेत. १८६ हुन अधिक विविध प्रकारची सेंद्रिय पिके फुलविली आहेत. यामध्ये जवळपास तीन ते पाच हजार वर्षांपूर्वीचे देशी गव्हाचे वाण तसेच मका, ज्वारी, दहा ते पंधरा प्रकारची वेलवर्गीय, कंदवर्गीय, पर्णवर्गीय, फलवर्गीय पिकांचा समावेश आहे.
या पाठोपाठच आठ ते नऊ प्रकारची भरडधान्य पिकविण्यात आली आहेत. विविध प्रकारच्या देशी भाज्या उत्कृष्टरित्या घेतली आहेत. तसेच विदेशात फक्त पॉलिहाऊसमध्येच घेतल्या जाणाऱ्या विदेशी भाज्या कणेरी मठावर मात्र उघड्या माळावर या भाज्या पिकवून यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. या माध्यमातून अशक्यही शक्य करून दाखविण्यात आले आहे. त्यामुळे ही शेती शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे.
याबरोबरच आजच्या तरुणाला शेतीतून उद्योग निर्माण होण्यासाठी या ठिकाणी आळंबी प्रकल्प, मधमाशी पालन, रेशीम निर्मिती उद्योग विकसित करण्यात आले आहेत. या उद्योगांची जिवंत प्रात्यक्षिकासह माहिती तरुणांना घेता येईल व रोजगार निर्मिती करता येणे शक्य होईल. त्याचबरोबर रासायनिक खतांऐवजी घरच्या घरीच हिरवळी खताची निर्मिती कशी करावी याचे जिवंत प्रात्यक्षिकच येथे शेतकऱ्यांना पाहावयास मिळणार आहे.
सेंद्रिय शेती केल्यास उत्पादन कमी येते ही शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी सिद्धगिरी संस्थान मठाने यशस्वीरित्या फुलवलेली सेंद्रिय शेती शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या पंचमहाभूत लोकोत्सवास उपस्थित राहून शेतकरी हितासाठी मोठ्या मेहनतीने फुलवलेल्या या सेंद्रिय शेतीची माहिती घ्यावी असे आवाहन परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केले आहे.







