गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी (कागल, चंदगड, राधानगरी, गडहिंग्लज, आजरा, भुदरगड) प्रभात साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दिले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आजवर मांडलेले विचार ध्यानात ठेवूनच आपल्याला पुढील वाटचाल करायची आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच शैक्षणिक संस्था यांना भेडसावणाऱ्या असंख्य प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. त्यासाठी आपल्या पिढीसमोरील विविध शैक्षणिक आव्हानांचा, समस्यांचा अभ्यास आणि प्रसंगी आंदोलनं करण्यासाठी तुम्ही सदैव सज्ज रहायलाच हवे. 'महाराष्ट्रातील सर्वात प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना' अशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची ओळख निर्माण करण्यासाठी झपाटून काम कराल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या निवडीबद्दल प्रभात साबळे यांचे मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

