मंडल कृषी अधिकारी हरिदास बोंगे यांचे आवाहन
हसुरवाडी येथे पाककला स्पर्धा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): केंद्र शासनाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरवले आहे. हसुरवाडी व परिसरातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी तृणधान्य उत्पादन वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे. शिवाय ज्वारी, नाचणी आदी तृणधान्यापासून उपपदार्थांची निर्मिती करून आपले जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावे. यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन लघु उद्योग सुरू करावेत.असे आवाहन महागाव मंडल कृषी अधिकारी हरिदास बोंगे यांनी केले.
हसुरवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त पाककला स्पर्धा आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच कोमल भोसमोडे होत्या.
यावेळी गडहिंग्लज मंडळ कृषी अधिकारी रजनी देशमुख यांनी मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक प्रयोग करत असताना सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे. कीटकनाशक वापराचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत आहेत. त्यासाठी जीवामृत तयार करून त्याचा वापर शेतकऱ्याने आपल्या शेतात करावा असे आवाहन केले.
यावेळी कृषी पर्यवेक्षक हरिचंद्र सिताप, कृषिपर्यवेक्षक विकास जोशीलकर, पाककला पर्यवेक्षक सौ.कातकर, प्रभाग समन्वयक श्री.चौगुले, कृषी सहाय्यक डी. आर. कुंभार, विलास गुजर, नंदकिशोर दुनगहू, सीआरपी कांचन वाघराळकर व धन्वंतरी देसाई, उपसरपंच जयदीप सरनोबत, माजी सरपंच संजय कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सुनिता वाघराळकर, शुभांगी पाटील, अमित कांबळे, जयश्री कल्लोळी, रामा चव्हाण, रेखा गिरी यांच्यासह स्पर्धेतील सहभागी महिला व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पाककला स्पर्धेतील सहभागी व विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन विलास गुजर यांनी केले.

