Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी ग्रामस्थांनो कणेरी मठावरील लोकोत्सवाला विविध स्वरूपात मदत द्या!

ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना आवाहन

धान्य, कडधान्य, कपडे, भांडी स्वरूपात मदत करा


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
कणेरी मठ येथे आयोजित सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवास तेरणी ग्रामस्थांनी आपापल्या परीने विविध स्वरूपात मदत करून सहकार्य करावे असे आवाहन तेरणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. राज्य, देश विदेशातून या लोकोत्सवाला मदतीचा ओघ सुरू असून यामध्ये तेरणी ग्रामस्थांनीही सहभाग नोंदवून लोकोत्सवास मदत करून योगदान देण्याचे आवाहन केले आहे.

श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठ, कोल्हापूर यांचे वतीने  सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव दि.२० ते २६ फेब्रुवारी या दरम्यान आयोजित केला आहे. सदर महोत्सव हा मानवी जीवनासाठी महत्वाचे घटक असणाऱ्या पंचमहाभूतांवर आधारित आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे पर्यावरणाची होत असलेली हानी रोखून पर्यावरण संवर्धनासाठी या लोकोत्सवाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. लोककल्याणाचे हे काम कणेरी मठ सिद्धगिरी संस्थानचे प्रमुख काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

 कृषी, शैक्षणिक, विज्ञान, सांस्कृतिक, सामाजिक, पशु-पक्षीविषयक आणि मानवी निरोगी आरोग्य संवर्धनपर आशा विविध उपक्रम यांचे प्रदर्शन व जागरण भरविले जाणार आहे. सदर महोत्सवात देशभरातील पाचशे विद्यापीठांचे कुलगुरू, शिक्षण तज्ञ आणि शास्त्रज्ञ, कृषी तज्ञ, डॉक्टर्स आणि समाज प्रबोधक तसेच साधू-संत  या  महोत्सवात मार्गदर्शन करणार आहेत. तसेच भारतीय लोककला, लोकगीते, लोकनृत्ये यांचे सादरीकरण केले जाणार आहे.

या सात दिवसांच्या महोत्सवात देश व विदेशातून अंदाजे 30 लाख लोक उपस्थित राहतील असे नियोजन आहे. शिवाय महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक व पर्यावरण विभागाचे देखील या लोकोत्सवाला सहकार्य लाभत आहे. यासाठी आपल्या गावच्या वतीने काही एक मदत व्हावी अशी अपेक्षा आहे. यासाठी तेरणी गावातील ग्रामस्थांनी सढळ हाताने गहू, ज्वारी, तांदूळ, हरभरा डाळ, तूर डाळ तसेच वापरलेली पण न फाटलेली आणि वापरात नसणारी कपडे (साडी), भांडी (ताट, वाटी ग्लास) दान  करून खारीचा वाटा उचलावा असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.