गडहिंग्लज (प्रतिनिधी): बसर्गे येथील लक्ष्मी दूध संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत सतारूढ श्री लक्ष्मी महाविकास संस्थापक पॅनेलने अकरापैकी १० जागा जिंकत आपले वर्चस्व कायम ठेवले. विरोधी पॅनेलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
तालुक्याच्या पूर्व भागातील बसर्गे एक मोठे गाव. भाजीपाला व दुग्ध उत्पादनामध्ये आपला ठसा उमटवून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. सन १९७३ मध्ये संस्थापक चेअरमन संतराम गुंडू नौकुडकर यांनी संस्थेची स्थापना केली. 'एकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ' या उक्ति प्रमाणे सभासदांना सलग सहा वर्षे १९ टक्के फरक बील देण्यात संस्था तालुक्यात अग्रस्थानी आहे. संस्थेच्या कार्याची दखल घेऊन गोकुळ दूध संघाच्या वतीने बल्क कुलर युनिट सन २०२१ पासून कार्यरत आहे.
निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न झाले, पण तडजोडीत एकमत न झाल्यामुळे अखेर निवडणूक लागली. रविवार दि. १२ मार्च रोजी सकाळी ८ते ४ या वेळेत बसर्गे येथील कै. शंकरराव नाडगोंडे विद्यामंदिर येथे अत्यंत चुरशीने मतदान झाले. अनिल चिकने यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. ५२२ पैकी ४८२ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ५ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. सर्वसाधारण गटातील उमेदवार सतीश थोरात व बसवाणी टोणपी यांना समान मते पडल्याने फेर मतमोजणी करण्यात आली. पुन्हा समान मते पडल्याने कु. सानिका सुरेश कोळी ह्या शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते चिट्टी काढण्यात आली. अखेर बसवाणी टोणपी यांच्या बाजूने कौल मिळताच उपस्थित कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी माजी जि. प. सदस्य चंद्रशेखर पाटील यांनी विजयी सभेत आपले मनोगत व्यक्त केले. सत्तारूढ़ आघाडीचे व्ही. एस टोणपी, सातगोंडा जिनानावर, चंद्रशेखर पाटील, श्रीपतराव चौगुले, वसंत चौगुले, सुरेश मणिकेरी यांनी नेतृत्व केले. तर विरोधी आघाडीचे भरत जाधव, दिलीप चौगुले, बाबुराव पाटोळे, शिवानंद घस्ती यांनी नेतृत्व केले.
विजयी उमेदवार असे- सुरेश कागिनकर, दुंडापा घुळाणावर, नामदेव चौगुले, प्रसाद जाधव, बसवाणी टोणपी, सुभाष नाईक, बसवाणी कांबळे, सुभाष मणिकेरी, अरूण नौकुडकर, वंदना नौकुडकर, महादेवी संकेश्वरी.

