मुंबई : माजी जिल्हा परिषद सभापती संग्रामसिंह कुपेकर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चंदगड विधानसभा संघटक संग्रामसिंह कुपेकर कोणत्या पक्षात जाणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती. अखेर श्री.कुपेकर यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला.
यावेळी भैय्यासाहेब कुपेकर, बाळासाहेब कुपेकर, दिगंबर देसाई, बबनराव देसाई, आनंदराव देसाई, बंडोपंतराव राणे, तानाजी पाटील, शेखर गावडे, डॉ. अनिल पाटील, प्रमोद कांबळे, सचिन सातवणेकर, अजय कदम, अमृत जत्ती, प्रभाकर देसाई, मारुती कदम, एन.डी. कांबळे, आनंदराव मटकर, बसाप्पा पाटील, कांता गावडे, रवी गावडे, शरद गावडे, संतोष मोरे, संदीप पेडणेकर, जयवंतराव पाटील, बाळासाहेब मनगुतकर, शाहू जाधव, राजू यादव दशरथ पन्हाळकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश झाला.
संग्रामसिंह कुपेकर हे विधानसभेचे माजी सभापती बाबासाहेब कुपेकर यांचे पुतणे आहेत. मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असणारे कुपेकर यांनी सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. जिल्हा परिषदेत बांधकाम व आरोग्य सभापती म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर संग्राम कुपेकर यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू होती. भाजप नेत्यांच्या नेत्यांशी त्यांची वाढलेली जवळीक आणि आगामी निवडणुका यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अखेर मंगळवारी भाजपात प्रवेश केला.
यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, शिवाजीराव पाटील उपस्थित होते.

