जुनी पेन्शन योजना लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी
कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू
![]() |
| गडहिंग्लज : आंदोलनाला पाठिंबा देवून संबोधित करताना पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यात यावी या मागणीसाठी गडहिंग्लजला शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
![]() |
| गडहिंग्लज : जुन्या पेन्शन योजनेसाठी प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करताना कर्मचारी. |
सकाळी अकरा वाजल्यापासून या आंदोलनाला प्रारंभ झाला. सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जोरदार निदर्शने केली. प्रांताधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर रफिक पटेल, प्रा. शिवाजीराव होडगे, अविनाश कुलकर्णी, सचिन शिंदे, सचिन रेडेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक, मुख्याध्यापक राजेंद्र खोराटे, रवळू पाटील, अनिल बागडी, नामदेव यादव, ग्रामसेवक के. टी. सिताफ, प्रा. अशपाक मकानदार आदींची भाषणे झाली.
![]() |
| गडहिंग्लज : येथे बोलताना रवळू पाटील. |
दरम्यान, तहसीलदार व प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब आणि आता हिमाचल प्रदेश सरकारने देखील जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करून कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. मात्र महाराष्ट्र सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जोपर्यंत शासन राज्यातील दिनांक १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना १९८२ व १९८४ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरू राहील असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. या आंदोलनात शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
![]() |
| गडहिंग्लज : येथे बोलताना प्रा. शिवाजीराव होडगे. |
दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांच्यासह सागर पाटील, शशिकांत मोहिते, बाळासाहेब भैसकर यांनी पाठिंबा दर्शवला.
![]() |
| गडहिंग्लज : आंदोलनात सहभागी नगरपालिका कर्मचाऱ्यांना पाठींबा दर्शवताना पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांच्यासह सागर पाटील, शशिकांत मोहिते व बाळासाहेब भैसकर. |





