आजी-माजी सैनिक संघटनेच्या पुढाकारातून केली उभारणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): निलजी (ता. गडहिंग्लज) येथील गावच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बांधण्यात आलेल्या स्वागत कमानीचे उदघाटन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे व बिदर येथील चिटकुपा मठाचे मरुळसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. नूल मठाचे गुरुसिद्धेश्वर महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
निलजी येथील शाळा शताब्दी महोत्सवानिमित्त गावातील आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने चार लाख रुपये खर्चून गडहिंग्लज- संकेश्वर मार्गावरील मुख्य प्रवेशद्वारावर स्वागत कमानीचे बांधकाम करण्यात आला आहे. याचे उदघाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी प्रातांधिकारी वाघमोडे यांनी नवीन होणाऱ्या हायवे लगतच सैनिक संघटनेने उभारलेल्या या स्वागत कमानीने निलजी गावच्या वैभवात अधिकच भर पडला असून संघटनेचे हे सामाजिक कार्य प्रेणादायी असल्याचे सांगत सैनिकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव मांजरे, पोलीस पाटील सतीश काळापगोळ, लगमा नवणी, सुभाष सिदनाईक, शंकर जरळी, सैनिक वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष कुमार पाटील, शिवाजीराव काकडे, एन. बी. पाटील, तानाजी बिद्रेवाडी उपस्थित होते. याकामी गावातील सर्व आजी-माजी सैनिक, तरुण मंडळ कार्यकर्ते व ग्रामस्थाचे सहकार्य मिळाले.


