Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पँथरची चळवळ ही समाजाला जोडणारी : केंद्रीय मंत्री रामदास आठवले

गडहिंग्लजला शिवराज महाविद्यालयाच्या प्रांगणातील छत्रपती शाहू महाराजांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण 


गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांच्या अर्ध पुतळ्याच्या अनावरणाप्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्यासह इतर मान्यवर.                                                                         (छायाचित्र : मज्जिद किल्लेदार) 

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारावर चाललेल्या चळवळीला आमच्या पँथरनी मोलाचे योगदान दिले आहे. पँथरची चळवळ ही समाजाला जोडणारी आहे. अन्यायाविरुद्ध लढणारी ही चळवळ आमच्या पँथरच्या योगदानावर पुढे वाटचाल करीत आहे. माझ्या या आंदोलनात सतत योगदान दिलेले मल्लापाण्णा कांबळे, राम सलवादे, शिवाजी कांबळे, शंकर सूर्यवंशी, डी.वाय.कुरणे, गौराबाई सलवादे, यशवंत कांबळे, बाबुराव कासारीकर हे दिवंगत कार्यकर्ते आज आपल्यामध्ये नाहीत. या कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान आम्ही कधीच विसरू शकणार नाही. त्यांनी दिलेले योगदान हे चळवळीला बळ देणारे होते. अशा या दिवंगत कार्यकर्त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही आहोत. ही चळवळ अशीच पुढे घेवून जायचे आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.




येथील शिवराज महाविद्यालयाच्या प्रांगणातील छत्रपती शाहू महाराज यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.


गडहिंग्लज : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सत्कार करताना शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे. यावेळी उपस्थित इतर मान्यवर.
                                 (छायाचित्र मज्जिद किल्लेदार)  

प्रारंभी स्वागत विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी केले व प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिल कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम आदींनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा यथोचित सत्कार केला.


यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुढे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वांना आरक्षण दिले. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले योगदान हे अत्यंत मोलाचे आहे. आपले संविधान जगात गौरविलेले संविधान आहे. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. खरेतर आंबेडकर चळवळ ही सर्वच जाती-धर्मांना जोडणारी चळवळ आहे. या देशाला मजबूत करणारे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. डॉ. आंबेडकर यांचे वैचारिक मूल्य देशाला अखंड ठेवणारी आहे असे स्पष्ट करून आर.पी.आय.च्या दिवंगत कार्यकर्त्यांना आदरांजली वाहिली.


गडहिंग्लज : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी चर्चा करताना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे.
                                (छायाचित्र : मज्जिद किल्लेदार) 


ते पुढे म्हणाले, शिवराज महाविद्यालय या भागातील लोकप्रिय संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब विद्यार्थी घडत आहेत. या भागातील सर्वांशी शिक्षणातून जे ऋणानुबंध जपले आहेत ते अत्यंत मोलाचे आहे. अशा विद्या संकुलाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.


यावेळी आर.पी.आय.चे प्रदेश संघटक शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष जानबा कांबळे, राज्य संघटक बी.के.कांबळे आदींनी आपल्या भाषणातून दिवंगत कार्यकर्त्यांना आदरांजली वाहिली.




या कार्यक्रमास जिल्हा संपर्क प्रमुख मधुकर कांबळे, दिलीप कांबळे, शहराध्यक्ष मोहन बारामती, जयवंत कांबळे, बसवराज कांबळे, विठ्ठल चुडाई यांच्यासह आरपीआयचे कार्यकर्ते, शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष जे.वाय. बारदेस्कर, संस्थेचे अन्य पदाधिकारी, जि.प.सदस्य ॲड. हेमंत कोलेकर, विद्या संकुलाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. आरपीआयचे तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे व प्रा. स्वप्निल आर्दाळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.