कै. अरुण नाईक यांच्या पत्नीच्या अंगावरील सौभाग्य अलंकार न उतरवण्याचा निर्णय
घरातील युवा पिढीच्या पुढाकाराने निर्णय
महिला व मुला-मुलींनी विधवा प्रथा बंदीची घेतली शपथ
क्रांतीकारक निर्णयाने तालुक्यात नाईक कुटुंबियांचे कौतुक
![]() |
| बसर्गे : विधवा प्रथा बंदीची शपथ घेताना पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांच्यासह कुटुंबातील महिला व मुली. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): बसर्गे येथील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नाईक यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीच्या अंगावरील सौभाग्य अलंकार न उतरवण्याचा क्रांतीकारक निर्णय त्यांच्या घरातील युवा पिढीने घेत विधवा या अनिष्ट प्रथेला मूठमाती दिली आहे. कै. अरुण नाईक यांचे बंधू पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांच्यासह त्यांच्या घरातील युवक व युवतीनी विधवा प्रथा बंदीची शपथ घेतली आहे. बाळेश नाईक यांनी युवा पिढीने पुढाकार घेत घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करून समर्थन केले. नाईक कुटुंबीयांनी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक व क्रांतीकारक असून राज्यात आदर्शवत आहे.
बसर्गे येथील पंचायत समितीचे माजी सदस्य व जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांचे बंधू सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नाईक यांचे बुधवारी मुंबई येथे हृदयविकाराने निधन झाले. गुरुवारी बसर्गे येथील मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी निधनानंतरचे सर्व विधी पार पाडण्यात आले. मात्र यावेळी कै. अरुण नाईक यांच्या पत्नींच्या अंगावरील कोणतेही सौभाग्य अलंकार उतरवण्यात येऊ नयेत अशी विनंती कै.अरुण नाईक यांचे चिरंजीव अजय, कन्या अर्चना व श्रद्धा यांच्यासह कुटुंबियातील पुनम, वर्षा, मानसी, स्नेहल, साक्षी, मान्या, कोमल, रेखा, वसुंधरा, शुभांगी, सागर, विजय, अमोल, शिवम या युवा पिढीने बाळेश नाईक यांच्याकडे केली. घरातील युवा पिढीच्या या क्रांतिकारक विचाराचे श्री नाईक यांनी स्वागत करत विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. तशी शपथही शुक्रवारी सर्वांनी घेत विधवा या अनिष्ट प्रथेला नाईक कुटुंबीयांनी मूठमाती दिली.
पती निधनानंतर स्त्रीच्या अंगावरील सौभाग्य अलंकार उतरवले जातात. कपाळावरील कुंकू पुसला जातो. हातातील बांगड्या फोडल्या जातात. यामुळे हा प्रसंग ज्या स्त्रीवर ओढावतो याचे दुःख त्या स्त्रीला असाह्य करून सोडते. विधवा नावाचा शिक्का त्या स्त्रीवर पडतो. कोणत्याही शुभकार्यात त्यांना घेतले जात नाही. त्यांना दुय्यम स्थान दिले जाते. अशी ही कुप्रथा गेली अनेक दशके चालत आली आहे. मात्र अशा या अनिष्ट प्रथेला सर्वप्रथम छेद देऊन समाज प्रबोधन करण्याचे काम शिरोळ तालुक्यातील हेरवाड या गावाने केला. विधवा प्रथा बंदीचा कोल्हापूर जिल्ह्यात सर्वप्रथम ठराव या गावाने केला. त्यानंतर विधवा प्रथा बंदीची चळवळ जिल्ह्यात किंबहुना राज्यात जोरात सुरू झाली. ही प्रथा बंद पाडून जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी विधवांना सन्मानाची वागणूक देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आता याची जागृती दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र असून या निर्णयाने विधवा महिलांना सन्मानाची वागणूक मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नाईक कुटुंबीयांनीही घेतलेला हा निर्णय निश्चितच क्रांतिकारक आहे.
नाईक कुटुंबियांची तालुक्यात एक वेगळी ओळख
सात भाऊ व एक बहीण असा नाईक कुटुंबियांचा मोठा परिवार. दोघा भावांचे निधन झाले असून आता पाच भाऊ, एक बहीण त्यांची मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे. पंचायत समितीचे माजी सदस्य व जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांनी विद्यार्थीदशेपासूनच सर्वसामान्य, गोरगरीब जनतेसाठी विविध आंदोलनाच्या माध्यमातून लढत आहेत. आजतागायत देखील सर्वसामान्यांसाठी ते लढा देत असून 'गोरगरिबांचे कैवारी' म्हणून ते ओळखले जातात. विधवा या अनिष्ट प्रथेला मूठमाती देण्याचे काम त्यांनी आपल्या घरातूनच सुरुवात करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.


