ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन
![]() |
| कोल्हापूर : सहाय्यक कामगार आयुक्त एस.एम. हुंबे यांना निवेदन देताना गडहिंग्लज शिवसेना उपशहरप्रमुख काशिनाथ गडकरी, हलसवडे शाखाप्रमुख अभिजीत पाटील यांच्यासह इतर. |
कोल्हापूर (प्रतिनिधी): बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या कल्याणकारी योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देण्यास दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त एस.एम.हुंबे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन गडहिंग्लज उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी, हलसवडे शाखाप्रमुख अभिजीत पाटील यांनी दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनामार्फत राज्यातील बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना विवाह, प्रसूती, शैक्षणिक खर्च आदींसह विविध ३० प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील बऱ्याच कामगारांनी प्रसूती व शालेय खर्च मिळण्यासाठी वर्षभरापूर्वी ऑनलाईन अर्ज केले आहेत. मात्र अद्याप एकाही लाभार्थ्याच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. नव्याने दाखल केलेल्या कामगारांचे अर्जही अद्याप प्रलंबित आहेत. त्याचबरोबर स्मार्ट कार्ड काढण्यासाठी कामगारांची यादी कार्यालयाकडे देऊन सुद्धा उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे मनमानी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी व प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात यावेत अशी मागणी या निवेदनातून केली आहे.

