Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांनी मनातील न्यूनगंड झटकल्यास यश निश्चित!

अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांचे प्रतिपादन


महागाव येथे स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार





गडहिंग्लज (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये चांगली गुणवत्ता आहे. मात्र त्यांच्या मनात निर्माण झालेल्या  न्यूनगंडाने ते मागे पडतात. त्यांची गुणवत्ता विकसित होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मनातील न्यूनगंड झटकून मेहनत घेतल्यास नक्की यश मिळते असे प्रतिपादन गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी केले.


महागाव येथील सुमित्रा प्रतिष्ठान संचलित एकाग्रता अभ्यासिका व करियर गाईडन्स  सेंटरच्या वतीने स्पर्धा परीक्षेतून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आयकर आयुक्त मल्लिकार्जुन उत्तुरे होते.आयुर्विमा महामंडळाचे विकास अधिकारी प्रेम कुमार नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.



यावेळी बोलताना श्री. खाटमोडे पुढे म्हणाले,  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनात स्पर्धा परीक्षेच्या तयारीवेळी व निवड झाल्यानंतरही न्यूनगंड असतो. मग तो चालणं-बोलणं किंवा इंग्रजीत संभाषण करणे असेल. त्यासाठी आपल्या बाह्या व्यक्तिमत्वापेक्षा आपले खरे आणि नैसर्गिक असे व्यक्तिमत्व तेच आपल्याला जास्त उपयोगी पडते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. ती विकसित केली पाहिजे. आपल्यातील ज्ञानाचा उपयोग योग्य प्रकारे करून न्यूनगंड न बाळगता प्रचंड मेहनत घेतल्यास यश निश्चितच मिळेल. कठीण परिस्थितीशी झगडावे व त्यातून जे शिकाल त्याचा तुमच्या व्यक्तिमत्व विकासाला फायदा होईल. असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.




आयकर आयुक्त श्री. उत्तुरे म्हणाले, प्रामाणिकपणे अभ्यास करणारे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होतात. फक्त त्यासाठी तो क्षण यावा लागतो. कष्ट करताना आनंदाने करा. या कष्टातून तावून- सुलाखून  निघाल्यानंतर अनुभवातून तुम्ही मजबूत बनता. सामान्य माणूस असामान्यकडे पोहोचतो ते केवळ योग्य नियोजन, अपार कष्ट, जिद्द चिकाटीच्या जोरावरच. त्यासाठी प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांनी परिश्रम घ्यावे यश निश्चित मिळेल असे आवाहन त्यांनी केले. 

     


यावेळी एकाग्रता अभ्यासिकेचे एमपीएससी परीक्षेतून मुलींमध्ये राज्यात चौथा क्रमांक पटकावून राजपत्रिका अधिकारी वर्ग एक पद मिळवलेल्या श्रद्धा चव्हाण, भारतीय सैन्य दलात निवड झालेले दीपक जाधव, प्रदीप रेडेकर यांचा सत्कार करण्यात आला.



   


सत्काराला उत्तर देताना श्रद्धा चव्हाण हिने माझ्या यशामध्ये एकाग्रता अभ्यासिका, आयकर आयुक्त मल्लिकार्जुन उत्तुरे, प्रेम कुमार नाईक यांचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद केले.


  

सूत्रसंचालन अक्षता कुपटे हिने केले व आभार सचिन पाटील यांनी मानले. यावेळी अभ्यासिकेतील विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.