Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आकांक्षांपुढती गगन ठेंगणे....!

दुंडगेच्या अंध माधव नाईक याची पश्चिम रेल्वेत सहाय्यक पदावर निवड




गडहिंग्लज (प्रतिनिधी): परिस्थितीशी रडत न बसता मनात जिद्द व ध्येयापर्यंत पोचण्याची चिकाटी बाळगल्यास यश निश्चित मिळवता येते, हे आपल्या कृतीतून गडहिंग्लज तालुक्यातील दुंडगे येथील माधव नाईक या अंध बांधवाने दाखवून दिले आहे. आपल्याला आलेल्या अंधत्वामुळे निराश न होता प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अपार कष्ट घेतल्याने त्याची पश्चिम रेल्वेत इंजीनियरिंंग विभागात सहाय्यक पदावर निवड झाली आहे. 


मूळचे शेंद्री येथील लक्ष्मी मंदिराचे पुजारी दयानंद नाईक यांचा माधव हा चिरंजीव आहे. नाईक कुटुंबीयांची परिस्थिती बेताची आहे. थोडीफार असणारी शेती हाच त्यांचा उदरनिर्वाहाचा आधार आहे. माधव याला अंधत्व आल्याने नाईक कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. मात्र माधव यांनी आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीला न घाबरता त्याच्याशी सामना करण्याचा निर्धार केला व त्याने त्या दृष्टीने आपली वाटचालही सुरू केली. 


नाईक कुटुंबीयांनी माधव याला कोल्हापूर येथील अंधशाळेत घातले. या ठिकाणी पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण माधव याने पूर्ण केले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याने यापुढीलही शिक्षण मोठ्या जिद्दीने पार पाडले. गडहिंग्लज येथील संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालयातून माधव यांने उच्च माध्यमिक शिक्षण घेतले असून सध्या माधव पदवीचे शिक्षण घेत आहे.


माधव याने मागील वर्षी पश्चिम रेल्वेची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये माधव याची सहाय्यक पदावर निवड झाली आहे. आपल्या अंधत्वावर व प्रतिकूल परिस्थितीवर मोठ्या धैर्याने मात करत यशाला गवसणी घालून अंध माधव याने समाजासमोर  एक वेगळा आदर्श  ठेवला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.