महामार्गासाठी जमिनीचे भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला वाढवून मिळणार
संगमनेर : शेतकरी व कष्टकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी किसान सभेच्या वतीने आयोजित अकोले ते लोणी लॉंग मार्च महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आला. या संदर्भात मोर्चात सहभागी असणाऱ्या शिष्टमंडळासोबत महसूल मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, कामगार मंत्री सुरेश खाडे, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड डॉ. अशोक ढवळे, डॉ.अजित नवले, बादल सरोज, डॉ. डी.एल.कराड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
बातमीचा व्हिडिओ येथे पहा 👇🏼
यावेळी बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, हिरडा उत्पादकांना भरपाई देण्यात येणार आहे. त्याचबरोबर वन जमिनी बाबत कोणालाही विस्थापित केले जाणार नाही. ११ नोव्हेंबर २०१६ च्या शासन आदेशाची अंमलबजावणी करण्यात येईल. महामार्गासाठी जमिनीचे भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला वाढवून देण्यात येईल. आदिवासी शेतकऱ्यांच्या वन जमिनीवर हिस्त्र प्राण्यांच्या आक्रमणापासून संरक्षण देण्यासाठी विविध उपायोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सकारात्मक चर्चा झाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

