आज पालखी पूजन, 211 धनगरी ढोलांच्या निनादात पालखी मिरवणूक व नगरप्रदक्षिणा
श्री संत बाळूमामा हालसिद्धनाथ मंदिर संस्थान गडहिंग्लज मार्फत मंदिर परिसरात प्रवचन सेवा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील श्री संत बाळूमामा हालसिद्धनाथ मंदिर संस्थानमार्फत बाळूमामा मंदिर परिसरात प्रवचन सेवा सुरु आहे. प्रवचन केसरी प.पू. मल्लिकार्जुन महाराज भोज यांच्या अमृतवाणीने दररोज सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेस प्रवचन सोहळा संपन्न होत आहे. त्यानंतर दररोज हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. या कार्यक्रमामुळे वातावरण भक्तिमय बनले आहे.
बारामतीचे बाळूमामा भक्त मेजर विक्रम सूर्यकांत जगताप महाराज वासुंदेकर यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी स्वागत व प्रास्ताविक मंदिर कमिटीचे अध्यक्ष रमेश रिंगणे यांनी केले. महाराजांचा स्वागतपर सत्कार परमपूज्य मल्लिकार्जुन महाराजांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जगताप महाराजांनी आपल्या पहाडी आवाजात मामांच्या जीवनावरील अनेक प्रसंग हुबेहूब भक्तांच्या समोर उभे केले .बाळूमामाचा जन्म, शिक्षण, बालपण व अनेक संकटे सांगताना भक्तांच्या डोळ्यात पाणी तराळले. यावेळी जवळपास सहा हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. आभार सुत्रसंचालक दिनकर खवरे यांनी मानले. यावेळी अजित विटेकरी, सुभाष देवगोंडा, चंद्रकांत सावंत यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज शुक्रवारी जगद्गुरु पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी सिध्द संस्थान मठ निडसोशी, श्री गुरुसिध्देश्वर महास्वामीजी सुरगीश्वर मठ कसबा नूल, भगवानगिरी महाराज रामनाथगिरी समाधी मठ नूल, डॉ .आनंद गोसावी महाराज ऋग्वेदी गोसावी मठ हत्तरकी, किसन महाराज, समर्थ नगर मठ,भडगाव यांच्या शुभहस्ते संत बाळूमामा मंदिरात पालखी पूजन होईल व सर्वांच्या दिव्य सानिध्यातच 211 धनगरी ढोलांच्या निनादात श्री संत बाळूमामाची पालखी मिरवणूक व नगरप्रदक्षिणा होणार आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता बाळूमामा भक्त बळवंत लोंढे यांच्या धनगरी ओव्यांचा कार्यक्रम संपन्न होईल. रात्री भगवान डोळे महाराज यांच्या भाकणुकीचा कार्यक्रम संपन्न होईल.
शनिवार दिनांक 29 रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून महाप्रसादाला प्रारंभ होईल. भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर कमिटीकडून करण्यात आले आहे. यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष रमेश रिंगणे, उपाध्यक्ष विठ्ठल भमानगोळ, चंद्रकांत सावंत, जयसिंग पवार, राजू पोवळ, बसवराज कोटे, जवाहर घुगरे, बाबूराव खोत, प्रकाश धबाले, आप्पासो बस्ताडे , बाळासाहेब सुतार व सर्व भक्तगण परिश्रम घेत आहेत.



