Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज तालुक्यात हत्ती आला... शांतपणे गेलाही .... पुढे काय?

मानवी वस्तीत हत्ती का व कुठून आला ?


या निमित्ताने विविध प्रश्न चर्चेत


कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज


पालकमंत्री गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देतील का?  





गडहिंग्लज (संतोष नाईक): गेल्या वीस- बावीस  दिवसापासून गडहिंग्लज तालुक्यात टस्कर हत्तीचा वावर दिसून येत आहे. हा हत्ती शांतपणे मार्गक्रमण करतो आहे. तालुक्यातील चिंचेवाडी वगळता फार मोठे नुकसान या हत्तीने कुठेही केलेले दिसत नाही. वन विभागानेही सतर्कता बाळगत या हत्तीला हाताळत मासेवाडी जंगलात सुखरूपपणे रवानगी केली आहे. गडहिंग्लज तालुक्यात हत्ती येणे ही घटना दुर्मिळ असली तरी केवळ लोकांचा गोंधळ व हुल्लडबाजीमुळे हा टस्कर आपली दिशा बदलत विविध गावांमध्ये भरकटल्याचे स्पष्ट झाले. हत्तीचा हा विषय तूर्त तरी शांत झाला असला तरी भविष्यात पुन्हा धोका उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना शासन स्तरावरून राबविणे तितकेच महत्त्वाचे आहे. या निमित्ताने काही प्रश्नही चर्चेत आलेत.




गडहिंग्लज तालुक्यातील भाग हा प्रामुख्याने शेतीप्रधान आहे. विविध पिके, भाजीपाला या ठिकाणी घेतला जातो. या भागात ऊस पिक सर्वाधिक घेतले जाते. ऊस पिक देखील हत्तीचे खाद्य असल्याने या भागात त्याचा मुक्काम वाढल्याचे दिसून आले. ऊस पिकासाठी या भागातील शेतकरी पाणी देण्यासाठी रात्रीही शेतात काम करताना दिसतात. मात्र सध्या या भागात टस्कराचा वावर वाढल्याने भविष्यात ऊस शेती करणे शेतकऱ्यांना अडचणीचे ठरू शकेल. परिणामी मनुष्यहानीही नाकारता येत नाही. शेतवडीतून या हत्तीचा वावर असल्याने विविध पिकांच्या रोपांचेहे नुकसान होत आहे. मुबलक खाद्य व पाणी न मिळाल्यास हत्तीकडून मोठे नुकसानही केले जाऊ शकते. भविष्यातील धोका लक्षात घेता या हत्तींचा वावर टाळण्यासाठी शासन स्तरावरून कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे आहे. सध्या हत्ती तालुक्यातील मासेवाडी जंगलात स्थिरावला असला तरी पुन्हा त्याचा प्रवास उलट दिशेने होऊ नये या दृष्टीने आतापासूनच योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे. ह्या हत्तीने आतापर्यंत कोणतेही मोठे नुकसान केले नसले तरी नागरिकांकडून हत्ती पिटाळण्यासाठी होत असलेला गोंधळ, हुल्लडबाजी हे प्रकार हत्ती हिस्त्र होण्यास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे हत्तीला शांततेत परतवून लावण्यास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनीही सहकार्य करणे तितकेच महत्त्वाचे आहे. गडहिंग्लज, आजरा, चंदगड उपविभागाला कोकण, कर्नाटक, गोवा ह्या राज्यांच्या सीमा देखील लागून असल्याने हत्ती अन्नाच्या शोधात भटकंती करत येतात. हत्ती येणे हे चंदगड व आजरा तालुक्याला नवीन नाही, मात्र गडहिंग्लज तालुक्यात हत्तींचा वावर असणे हा सध्याच्या घडीला तरी दुर्मिळ मानला जातो. हत्ती सुखरूपपणे व शांततेने परतला असला तरी येथील शेतकरी वर्गात मात्र हत्ती पुन्हा येईल याची भीती मनात आहे, आणि ही शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच यावर शासनाने तोडगा काढून उपायोजना राबविणे तितकेच महत्त्वाचे आहे.




हा हत्ती नेमका कुठून व कसा आला? 


ह्या टस्कर हत्तीचा जन्म हा आजरा तालुक्यातील हाळोली येथे झाला आहे. ह्या हत्तीचा वावर हाळोली, मसोली, वेळवट्टी, विटे, खानापूर व पुढे नेसरीपर्यंतच होता. या हत्तीचे वास्तव केवळ याच भागात होते. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नेसरी परिसरात हा हत्ती आल्याचे कळताच लोकांनी गोंधळ घालत याला पिटाळले त्यामुळे त्याने आपल्या नेहमीच्या वास्तव्याचा पट्टाच बदलला. दिशा बदलल्याने तो भरकटत गेला. तेथून शिपुर तर्फ नेसरी, लिंगनूर तर्फ नेसरी, बिद्रेवाडी या भागात दाखल झाला. लिंगनूर तर्फ नेसरी येथे लोकांनी गोंधळ घातल्याने त्यांनी आपली दिशा पुन्हा बदलली. तो मांगनूर तर्फ सावतवाडीच्या दिशेने गेला. या पट्ट्यात त्याला ऊस, फणस यासारखे मुबलक खाद्य मिळाल्याने या ठिकाणी त्याचा मुक्काम वाढला. बरेच दिवस तो सावतवाडी परिसरातच होता. येथेही नागरिकांनी फटाके फोडत त्याला पिटाळून लावल्याने त्याने तेथील मुक्काम हलवत पुढे मासेवाडीत गेला. मासेवाडी जंगलात 'कधी इकडे तर कधी तिकडे' असा तो करत राहिला. यादरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या हत्तीला सुरक्षित स्थळी रवानगी करण्याचा प्रयत्न केला मात्र या हत्तीने आपला प्रवास उलट्या दिशेने करत हसुरसासगिरी, हिडदुग्गी या भागात दाखल झाला. त्यानंतर त्याने पुन्हा सावतवाडीच्या दिशेने मार्गक्रमण केले. या ठिकाणी बरेच दिवस त्याचे मुक्काम होते. 


दरम्यान, मासेवाडी येथील नागरिकांनी फटाके वाजवत या हत्तीला कडाल गावापर्यंत हुसकावले. तेथून हा हत्ती तेगिनहाळ मार्गे तुपुरवाडी परिसरातून नरेवाडी धरण परिसरात दाखल झाला. या ठिकाणी या हत्तीने धरणाच्या पाण्यात मनसोक्त डुंबून, पाणी पिऊन रात्री तो पुढे मार्गक्रमण करीत राहिला. तेथून या परिसरातील मनवाड, नंदनवाड, तेरणी या मार्गे तो कर्नाटकातील उळागड्डी खानापूरच्या दिशेने गेला. कर्नाटक हद्दीतून पुणे- बेंगळूर महामार्गावर त्याने संचार केला. कर्नाटक वन विभाग व पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली करत या हत्तीला पुन्हा तेरणीच्या दिशेने महाराष्ट्र हद्दीत हुसकावले. महाराष्ट्र वन विभागाच्या ताब्यात या हत्तीला दिल्यानंतर कर्नाटकचे अधिकारी माघारी परतले. वनरक्षक रणजीत पाटील, सुनील भंडारे, तुकाराम जाधव यांनी मोठ्या शर्थीने या हत्तीला हाताळत पुन्हा मासेवाडी जंगलात त्याची रवानगी केली.




आजरा तालुक्यात एकूण दोन टस्कर


आजऱ्यात एकूण दोन टस्कर आहेत. यातील एका टस्कराचे वास्तव्य हे चंदगडमध्ये होते. मात्र चंदगडमध्ये असणारा टस्कर सध्या वास्तव्यास आजरा तालुक्यातील मसोली येथे आहे. वन विभागाच्या अंदाजानुसार  दोन टस्कर कधीही एकत्र वावरत नाहीत. एकत्र राहिल्यास त्यांच्यामध्ये संघर्ष होतो. दोन टस्करांमधील वास्तव्याचे अंतर हे किमान दहा ते पंधरा किलोमीटरचे असते. त्यामुळे त्यातील ह्या दुसऱ्या टस्कराने आपली जागा बदलत गडहिंग्लज तालुक्यातील शेतवडी व मानवी वस्तीत वावरत आहे. आता वन विभागाने त्याला मासेवाडी जंगलात स्थिरावले आहे. त्याच्या हालचालीकडे वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.




घाटकरवाडीत 'हत्तीग्राम' प्रस्तावित, मात्र स्थानिकांचा विरोध 


कर्नाटकातील 'सकरेबैलू' येथे 'हत्ती कॅम्प' आहे. या कॅम्प मधील हत्ती हे माहूतांच्या मदतीने माणसाळू बनवण्यात आले आहेत. या ठिकाणी लोकांना पर्यटन घडविले जाते. या कॅम्पमध्ये बरेचसे हत्ती आहेत. या धरतीवर आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथे 'हत्तीग्राम' प्रस्तावित आहे. मात्र स्थानिकांच विरोध असल्याने अद्याप हा प्रकल्प रखडला आहे. शेतवाडी व मानवी वस्तीत मुक्त संचार करणारे आजरा तालुक्यातील ह्या दोन्ही टस्करांना घाटकरवाडी येथे हत्तीग्रामध्ये बंदिस्त करून कर्नाटकातील माहुतांकरवी त्यांना माणसाळू करून घेण्याची शासनाची संकल्पना होती. मात्र नागरिकांचा वाढता विरोध पाहता अद्याप हे शक्य झालेले नाही. घाटकरवाडीत हत्तीग्राम झाल्यास या ठिकाणी हत्तींचे कायमस्वरूपी वास्तव्य ठेवून लोकांना कर्नाटक प्रमाणे या ठिकाणीही हत्ती पर्यटन  करण्याच्या दृष्टीने वाव असल्याचे वन विभागाकडून सांगितले जाते. मात्र स्थानिकांचा विरोध डावलून हा प्रकल्प राबविणे अशक्य आहे.





वनविभागाकडे अपुरे कर्मचारी 


गडहिंग्लज तालुक्यात हत्ती आल्यानंतर वन विभागातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रश्नही चर्चेत आला आहे. तालुक्यातच नव्हे तर किंबहुना संपूर्ण राज्यात वन विभागातील नवीन पद भरती नाही. उपलब्ध कर्मचाऱ्यांच्यावर अतिरिक्त पदभार सोपवला गेला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील अतिरिक्त दिलेली जबाबदारी   पाहता एखाद्या ठिकाणी हत्ती आल्याच्या घटना घडल्यास त्या ठिकाणी कर्मचारी उपलब्ध होणे फारच अडचणीची ठरते. त्यामुळे शासनाने वन विभागातील सर्व रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी होताना दिसत आहे.




सिंधुदुर्गातील उपाययोजना राबविता येतील का? 


गडहिंग्लज तालुक्यात हत्तीचा वावर हा दुर्मिळ आहे. गेले पंचवीस दिवस हत्तीने पिकांमध्ये धुडगूस घातला. आता माघारी फिरला असला तरी भविष्यात पुन्हा धोका निर्माण झाल्यास हत्ती घालवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेल्या काही उपाययोजनांचा वापर येथे करता येईल का याचा विचार होणे गरजेचे आहे.  २००७ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात हत्तींनी धुमाकूळ घातला होता. त्या ठिकाणी जीवितहानीही झाली होती. या ठिकाणी शासनाने त्यावेळी हत्तींना घालवण्यासाठी 'मिरची पूड' वापराचा प्रयोग केला होता. तो यशस्वीही ठरला होता. शेतात कापडामध्ये मिरची पूड बांधून ठेवल्याने हत्तींचा वावर या ठिकाणी कमी झाला होता. मिरची पूडच्या वासाने हत्ती फिरकत नसल्याचे दिसून आले होते. ही उपाय योजना राबविण्यासाठी  शासनाने त्यावेळी लाखो रुपये खर्च केले होते. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्यात हत्तींचा वारंवार असाच वावर वाढत राहिल्यास शेतकऱ्यांना मिरची पूड पुरवठा तसेच खंदक खोदणे अशा उपाययोजना राबविता येतील का? हे पाहणे गरजेचे आहे.




हत्ती आल्यास लोकांनी गोंधळ घालू नये : वनरक्षक रणजीत पाटील 


हत्तीला पिटाळण्यासाठी लोकांनी गोंधळ घातल्याने हा टस्कर आपले नेहमीचे वास्तव्याचे ठिकाण बदलून भरकटत गेला. सध्या मासेवाडी जंगलात त्याची रवानगी करण्यात आली आहे.  गोंधळ व हुल्लडबाजी केल्यास हत्तीची पळापळ होते व तो संतप्त होतो. परिणामी पिके तुडवत तो धुडगूस घालतो. हिस्त्र झाल्यास मनुष्य हानीचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी हत्ती आल्यास गोंधळ व हुल्लडबाजी न करता वन विभागाला कळवून सहकार्य करावे. असे आवाहन वनरक्षक रणजीत पाटील यांनी केले आहे.




'हत्ती प्रवेश झोन' जाहीर करता येईल का?


टस्कर हत्ती ज्या गाव परिसराच्या हद्दीत पाय ठेवतो तो परिसर 'हत्ती प्रवेश झोन' म्हणून जाहीर करण्यात यावा असा नियम आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या काळात असा जीआर काढण्यात आला होता. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्यात सध्या ज्या परिसरात या टस्कराचा वावर दिसून आला तो परिसर 'हत्ती प्रवेश झोन' म्हणून घोषित होईल का? याचीही चर्चा होताना दिसत आहे. या टस्कराने केवळ वीस पंचवीस दिवसच वास्तव्य तालुक्यात ठेवले असले तरी भविष्यात पुन्हा याचा वावर नाकारता येत नाही. त्यामुळे 'हत्ती प्रवेश झोन' जाहीर करण्याच्या दृष्टीने शासन विचार करेल का? असा सवाल शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे.




पालकमंत्री दीपक केसरकर लक्ष देतील का?

गडहिंग्लज तालुक्यात गेले वीस पंचवीस दिवस मानवी वस्तीसह शेतवडीत वावरणाऱ्या या हत्तीला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मासेवाडी जंगलात सुखरूपपणे घालविले असले तरी पुन्हा हा हत्ती केव्हा माघारी फिरेल हे सांगता येत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या मनातही भीतीचे वातावरण आहे. शेतवडीत काम करत असताना हत्तीचा वावर वाढल्यास शेतकऱ्यांना शेतात काम करणे मुश्किल होईल. कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तींचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी विविध यशस्वी प्रयोग राबविण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज तालुक्यातही सध्या सुरू झालेला हत्तीचा वावर वेळीच रोखण्यासाठी पालकमंत्री लक्ष घालतील का? अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होताना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.