सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड शिवाजी गुरवे यांचे वन अधिकाऱ्यांना निवेदन
आजरा : रामतीर्थ या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्याकडून पैसे घेणे बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी परिक्षेत्र वन अधिकारी यांच्याकडे निवेदनातून दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, आजरा रामतीर्थ हे पवित्र स्थान असल्यामुळे आजूबाजूच्या 20 किलोमीटर परिसरातून लोक येत असतात. हे अनेक वर्ष परंपरेने चालू आहे. सदर ठिकाणी वर्षातून एकदा मोठी यात्रा भरते. प्रत्येक महिन्याला लोक या ठिकाणी येत असतात. अलीकडे महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी बराच खर्च करून पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे व सुशोभीकरण केले आहे त्यामुळे गोव्याकडे जाणारे पर्यटकही वाढू लागले आहेत.
इथे येणारा प्रत्येक नागरिक श्रीमंतच आहे असे नाही त्यामुळे या ठिकाणी माणसी 10 रुपये व गाडीचे वेगळे पैसे अशी आकारणी चालू केले आहे. हे चुकीचे असून वन खात्याला सदर ठिकाणी कोणताही खर्च करावा लागत नाही, असे असताना विनाकारण गोरगरीब शेतकरी, व्यापारी, तालुक्याच्या ठिकाणी कामासाठी येणारे गरीब लोक, भाविक भक्त, मजूर, शळेची मुले यांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत आहे. आजरा हा ग्रामीण भाग आहे. याचा विचार करून पैसे घेणे बंद करण्यात यावे अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
दरम्यान, काहीं दिवसांपूर्वी शाळेच्या मुलांना पैसे नसल्याने रामतीर्थावर जाऊ न दिल्याने मधुनच माघारी फिरावे लागले हे योग्य नाही. रामतीर्थ या ठिकाणी न जाता ही मुले परत गेली आहेत. असे प्रकार होत गेले तर नागरिकांना ञास होणार आहे. पैसे घेणे बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर कॉम्रेड शिवाजी गुरव, युवराज सपकाळ, अनिल पोवार, निशिगंधा पवार, अथर्व गुरव, धनाजी ससाणे, सदू शिवणे, सदाशिव पाटील, पांडुरंग कांबळे, विशाल गुरव यांच्यासह इतरांच्या सह्या आहेत

