Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'त्या' हत्तीचा मोर्चा आता तेरणी, हलकर्णी परिसरात

 तेरणीतील शेतकऱ्यांचे नुकसान




गडहिंग्लज (प्रतिनिधी): गेले वीस दिवस झाले गडहिंग्लज तालुक्यात शेतवडीसह मानवी वस्तीत वावरणाऱ्या हत्तीने आपला मोर्चा आता तेरणी, हलकर्णी  परिसरात वळविला आहे. तेरणी मार्गे हा हत्ती महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर दाखल झाल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे. रविवारी सकाळी अकराच्या दरम्यान हत्तीने पुन्हा आपला मोर्चा हलकर्णी - तेरणी मार्गावर वळवला आहे. शेतवाडीतून हत्ती मार्गक्रमण करत आहे     


तालुक्यातील दुगुनवाडी, लिंगनूर तर्फ नेसरी या परिसरात सर्वप्रथम या हत्तीचे दर्शन झाले. दुगुनवाडी व लिंगनूर गावात भरवस्तीत हत्तीने प्रवेश केला होता. येथून शांतपणे या हत्तीने मार्गक्रमण केले होते. त्यानंतर हा हत्ती नौकूड, चिंचेवाडी परिसरात दाखल झाला होता. चिंचेवाडीत या हत्तीने आंबा व फणसाच्या झाडांचे तसेच पाण्याची टाकी व पाईपलाईनचे नुकसान केले होते.त्यानंतर या हत्तीने आता आपला मोर्चा तेरणी, हलकर्णी परिसरात वळविला आहे.



शनिवारी रात्री तेरणी येथे मनवाड रस्त्यावरील काही शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले आहे. राजू संती यांच्या ऊस पिकाचे तर प्रकाश ढब व संजू संती यांच्या ढबू मिरची रोपाचे नुकसान केले आहे. शेतवाडीतून हा हत्ती भटकत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल बनले आहेत. दरम्यान, सकाळी नऊ वाजता कर्नाटकातील हत्तरकी हद्दीत एका शेतकऱ्याला हा हत्ती दिसला. त्यानंतर या हत्तीने पुन्हा आपला मोर्चा हलकर्णी जवळील खडीमशीनकडे वळवला. तेथून काही नागरिकांनी हुसकावल्याने हा हत्ती पुन्हा हलकर्णी रोडवरील देसाई (काजगार) यांच्या शेताच्या दिशेने आला. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



हत्तीचा वावर शेतवडीत असल्याने तेरणीतील शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याची सूचना ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आल्याची माहिती सरपंच करवीर उथळे यांनी दिली.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.