गडहिंग्लज नगरपालिकेत बादलीतून दूषित सांडपाणी आणत मनसेचे आंदोलन
अधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवले दूषित सांडपाणी
आठवड्याभरात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आश्वासन
शिवश्री कॉलनी वासियांच्या समस्या प्रश्नी मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले आक्रमक
![]() |
| गडहिंग्लज : शिवश्री कॉलनीतील दूषित सांडपाणी बादलीतून पालिकेत आणत मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी आंदोलन केले. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील पाटील वसाहती मधील शिवश्री कॉलनीत तुंबलेल्या दूषित सांडपाणी प्रश्नि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होत नगरपालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला. मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी सदर दूषित सांडपाणी मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवत मनसे स्टाईलने आंदोलन केले. मनसेच्या या दणक्याने दूषित सांडपाण्यावर तात्पुरते मुरूम टाकण्याची कार्यवाही करण्यात आली.
![]() |
| गडहिंग्लज : दूषित सांडपाणी प्रश्नि पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारताना मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले. |
याबाबतची अधिक माहिती अशी की, आजूबाजूच्या गटारींचे दूषित सांडपाणी पाटील वसाहती मधील शिवश्री कॉलनी परिसरातील एका खासगी मोकळ्या जागेत येऊन तुंबले आहे. या दूषित पाण्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी दलदल वाढून डासांचे साम्राज्य वाढले असून दुर्गंधीही येत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यापासून येथील रहिवाशी या दूषित सांडपाण्यामुळे त्रस्त आहेत. याकडे वारंवार लक्ष वेधून देखील दुर्लक्ष झाले होते. दरम्यान, येथील नागरिकांनी मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांची भेट घेत सदर समस्या त्यांच्यापुढे मांडली. श्री चौगुले यांनी नागरिक व मनसे कार्यकर्त्यांसह नगरपालिकेत येत अधिकाऱ्यांना जाब विचारला. हे दूषित सांडपाणी बादलीतून आणत अधिकाऱ्यांच्या टेबलावरच ठेवून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले. जोपर्यंत सांडपाण्याची कायमस्वरूपी विल्हेवाटीची व्यवस्था होत नाही तोपर्यंत मनसे गप्प बसणार नसल्याचा इशारा श्री चौगुले यांनी यावेळी दिला. तातडीने हालचाली न केल्यास सदर दूषित पाणी अधिकाऱ्यांच्या अंगावर ओतू असा इशारा दिल्यानंतर आठवड्याभरात उपायोजना करण्याचे आश्वासन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले.
तत्पूर्वी तात्पुरती उपाययोजना म्हणून या दूषित सांडपाण्यावर मुरूम टाकण्यात येत आहे. आठवड्याभरात चर मरून या पाण्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांसह कॉलनीतील नागरिक उपस्थित होते.
मुरूम टाकल्याशिवाय पालिकेतून हलणार नाही
मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी पाटील वसाहतीतील शिवश्री कॉलनीवासियांची ही समस्या आक्रमकपणे उचलून धरली. अधिकाऱ्यानी आठवड्याभरात उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले, मात्र श्री चौगुले यांनी यावर समाधान न मानता आता याच क्षणी त्या दूषित सांडपाण्यावर मुरूम टाकण्याची कार्यवाही तात्पुरत्या स्वरूपात तरी करावी अशी मागणी केली. जोपर्यंत मुरूम टाकत नाही तोपर्यंत पालिकेतून हलणार नाही असा पवित्रा श्री चौगुले यांनी यावेळी घेतला.



