Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हरळी बुद्रुकच्या गुरव कुटुंबियांच्या उपोषणाची शासनाकडून दखल

घरकुल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन


३१ मे रोजी गावात बैठक घेऊन चर्चा करणार 


गुरव कुटुंबीयांनी घेतले उपोषण मागे 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): हरळी बुद्रुक येथील तानाजी हरी गुरव यांनी हक्काच्या निवाऱ्यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर गुरुवारी मुलाबाळांसह सुरू केलेल्या उपोषणाची शासनाने तातडीने दखल घेत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने श्री गुरव यांनी उपोषण मागे घेतले. या प्रश्नी दिनांक ३१ मे रोजी हरळी बुद्रुक ग्रामपंचायतीत बैठक घेऊन चर्चा करण्याचे ठरविण्यात आले आहे. तसे लेखी पत्र पंचायत समितीकडून देण्यात आले.  सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी पुढाकार घेत तानाजी गुरव यांच्या या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधले होते.   





हरळी बुद्रुक येथील तानाजी गुरव कुटुंबीय धोकादायक पडक्या घरात राहत असल्याने जीवितास धोका आहे. त्यामुळे घराबाहेर उघड्यावर मुलाबाळांसह ते राहत आहेत. पावसाळ्यापूर्वी निवाऱ्याची सोय झाली नाही तर  मुलांसह मंदिर किंवा गावातील गाव चावडीचा आधार त्यांना घ्यावा लागणार आहे. गुरव यांचे  घर सन 2016 -17 च्या अतिवृष्टीमध्ये पडले आहे. त्यामुळे सहा वर्षापासून ते भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत. चालू वर्षी गावची यात्रा झाल्याने घर मालकांना घर खाली करून द्यावे लागले. दुसरे घर भाड्याने घेऊन राहण्याची त्यांची परिस्थिती नाही. गुरव हे शेतमजूर असून तीन मुले शिक्षण घेत आहेत. सन 2016-17 च्या अतिवृष्टीमध्ये पंचनामा झालेला आहे परंतु अद्याप शासनाकडून निवाऱ्याची सोय झाली नाही. त्याचबरोबर तानाजी गुरव यांनी वडिलांच्या नावे असणाऱ्या पडक्या घराला वारस लावण्यासाठी अर्ज केला असून त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. या प्रश्नाकडे सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी लक्ष घालत याकडे शासनाचे लक्ष वेधले होते. दरम्यान, गुरुवारी तानाजी गुरव कुटुंबीयांनी न्याय मिळण्यासाठी आपल्या मुलाबाळांसह तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला प्रारंभ केला होता. याची तातडीने शासनाने दखल घेतली. अप्पर तहसीलदार यांच्या कार्यालयात गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत या संदर्भात बैठक घेण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलाचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच दिनांक 31 मे रोजी गावात बैठक घेऊन तोडगा काढण्याचे ठरवण्यात आले आहे.




दरम्यान, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक, अमर चव्हाण, प्रा. सुरेश वड्राळे आदींनी उपोषणस्थळी भेट देत गुरव कुटुंबीयांना पाठिंबा दर्शवून दिलासा दिला. निवाऱ्याअभावी आपल्या मुलाबाळांसह एखादे कुटुंब उघड्यावर राहते ही बाब फारच दुर्दैवी आहे. शासनाने लवकरात लवकर त्यांना निवाऱ्याची सोय करून द्यावी अशी मागणी वरील मान्यवरांनी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.